कणकवली, दि. ०२ : केंद्रीय अर्थसंकल्पाच्या माध्यमातून कोकणच्या सर्वांगीण विकासाला मोठी चालना देणारे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून, त्यामध्ये वैभववाडी–कोल्हापूर रेल्वेमार्गासाठी ३२४४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली.
कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी सांगितले की, या रेल्वेमार्गासाठी एकूण ६५०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून त्यापैकी ५० टक्के निधी केंद्र सरकार तर उर्वरित ५० टक्के निधी राज्य सरकार देणार आहे. त्यामुळे हा बहुप्रतिक्षित रेल्वेमार्ग प्रत्यक्षात साकारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
पालकमंत्री नितेश राणे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार व अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पातून कोकणच्या अर्थकारणाला मोठे बळ मिळाले आहे. खासदार नारायण राणे यांच्या माध्यमातून कोकणासाठी केंद्र सरकारकडून भरीव निधी उपलब्ध होत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.
या अर्थसंकल्पात मच्छीमार, नारळ व काजू उत्पादनासाठी विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत. मच्छीमारांना प्रोत्साहन देण्यासाठी ५०० नवीन तलावांची तरतूद करण्यात आली असून, यामुळे किनारपट्टीवरील मच्छीमारांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करता येणार आहे. स्टार्टअप, महिला बचत गट व मत्स्य उत्पादक संघटनांची साखळी अधिक मजबूत करण्यात येणार आहे. खोल समुद्रातील मासेमारीतून मिळणारा मासा करमुक्त करून निर्यातीसाठी प्रोत्साहन देण्यात येणार असल्याने मच्छीमार व्यवसायाला मोठा फायदा होणार आहे.
कोकणातील फळ उत्पादनाला ‘व्हॅल्यू क्रॉप’चा दर्जा देण्यात आला असून, यामुळे शेती क्षेत्राला चालना मिळणार आहे. नारळ उत्पादनाच्या दृष्टीने कोकणात मोठ्या संधी असून, त्यासाठी नारळ संवर्धन योजना राबवली जाणार आहे. तसेच काजूला जागतिक स्तरावर ‘प्रीमियम ब्रँड’ म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
वैभववाडी–कोल्हापूर रेल्वेमार्गाबाबत बोलताना नितेश राणे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पासाठी राज्य सरकारचा ५० टक्के खर्च उचलण्याचा निर्णय घेतला आहे. भूसंपादनाची प्रक्रिया आधीच सुरू करण्यात आली असून, निवडणुकीनंतर या कामाला गती दिली जाणार आहे. २०२८ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचा सरकारचा मानस आहे.
बंदर विकास व जहाजबांधणी क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात तरतूद करण्यात आली असून, सी-प्लेन सेवा सुरू करण्याचा निर्णय कोकणातील पर्यटनाला नवी दिशा देणारा ठरेल, असेही त्यांनी सांगितले. भविष्यात जलवाहतूक व पर्यटन क्षेत्रात कोकणाचा मोठ्या प्रमाणावर विकास होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अपक्ष उमेदवारांना पाठिंबा न देण्याचे आवाहन केले. “महायुती म्हणून आम्ही निवडणूक लढवत असून, अपक्षांना मत देऊन आपले मत वाया घालवू नका,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
या अर्थसंकल्पातील तरतुदींमुळे सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांच्या विकासाला मोठी चालना मिळणार असून, पुढील चार वर्षांत कोकणचा कायापालट निश्चितपणे दिसून येईल, असा विश्वास पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला.
फोटो सौजन्य : गूगल








