रत्नागिरीत महाविद्यालयीन शिक्षकाविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल; अल्पवयीन विद्यार्थिनीच्या तक्रारीवर शिक्षकावर गंभीर आरोप

शहरात खळबळ

रत्नागिरी, दि. ०५ : रत्नागिरी शहरातील एका ज्युनिअर कॉलेजमधील शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीशी अनैतिक व लैंगिक संबंध प्रस्थापित केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून, संबंधित शिक्षकाविरुद्ध पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात तसेच शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

पीडित विद्यार्थिनीने रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, फेब्रुवारी २०२१ ते जानेवारी २०२६ या कालावधीत हा प्रकार घडला. संबंधित शिक्षकाने आपल्या पदाचा गैरवापर करत विद्यार्थिनीशी प्रेमसंबंध निर्माण केले. लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवण्यात आले तसेच शहराबाहेर नेऊन फिरविण्यात आल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे.

तक्रारीत नमूद करण्यात आले आहे की, दीर्घकाळ संबंध ठेवूनही आरोपी शिक्षकाने नंतर लग्नास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे मानसिक, भावनिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागल्याचे पीडितेने सांगितले आहे. आपली फसवणूक झाल्याची जाणीव झाल्यानंतर पीडित विद्यार्थिनीने धैर्याने पुढे येत पोलिसांकडे तक्रार दाखल केली.

पीडितेच्या तक्रारीची तात्काळ दखल घेत रत्नागिरी शहर पोलिसांनी संबंधित शिक्षकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ६४(१), ६४(२)(फ), ६४(२)(m), ६९, ३५१ तसेच लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण (पॉक्सो) कायदा कलम ४, ६, ८ व १० अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक प्रियांका देसाई करत आहेत. आरोपी शिक्षकाची चौकशी सुरू असून पुढील कारवाई तपासाअंती करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून, शिक्षकाकडून अशा प्रकारचे कृत्य घडणे ही अत्यंत गंभीर आणि चिंताजनक बाब असल्याची प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे. विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

दरम्यान, पोक्सो कायद्यानुसार अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात कठोर शिक्षा करण्याची तरतूद आहे. त्यामुळे या प्रकरणात आरोपी शिक्षकावर कडक कारवाई होणार का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा प्रकारच्या घटना घडल्यास त्वरित पोलिसांत तक्रार दाखल करावी आणि पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी समाजाने पुढे यावे.

आणखी वाचा