रत्नागिरी, दि. ५ : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी सुरू असलेली राजकीय रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात आली असून गुरुवारी (ता. ५) रात्री दहा वाजता जाहीर प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. उद्या प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने सर्वच राजकीय पक्ष व उमेदवारांनी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. गेल्या पंधरवड्यापासून जिल्ह्यातील ५६ गट व ११२ पंचायत समिती गणांसाठी सुरू असलेल्या प्रचाराचा समारोप गावोगावी निघणाऱ्या पदयात्रा, रॅली, कोपरा सभा, प्रचार बैठका आणि घरभेटींच्या माध्यमातून होणार आहे.
या निवडणुकीत जिल्ह्यात महायुती व महाविकास आघाडी यांच्यात थेट सामना रंगला असून सत्ताधारी व विरोधक अशा दोघांसाठीही ही लढत प्रतिष्ठेची ठरली आहे. रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य सुविधा, स्थानिक विकासकामे, रोजगारनिर्मिती, शिक्षण व कृषीविषयक प्रश्न हे प्रचाराचे प्रमुख मुद्दे राहिले. प्रत्येक उमेदवाराने आपल्या क्षेत्रातील विकासकामांची यादी मांडत मतदारांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक ठिकाणी व्यक्तिगत आरोप-प्रत्यारोपांनी प्रचाराला अधिक तीव्र स्वरूप आले.
महायुतीकडून पालकमंत्री उदय सामंत आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी प्रचाराची मुख्य धुरा सांभाळली आहे. जिल्ह्याच्या विविध भागांत त्यांनी प्रचार फेऱ्या घेत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रचारसभांनी वातावरण अधिक तापले असून महायुतीने महत्त्वाच्या गटांमध्ये जोरदार सभा घेऊन आपली ताकद दाखवून दिली आहे. विशेषतः रत्नागिरी, राजापूर, दापोली, खेड आणि चिपळूण या भागांत महायुतीचा प्रचार अधिक आक्रमक स्वरूपाचा राहिला.
दुसरीकडे महाविकास आघाडीकडून माजी खासदार विनायक राऊत आणि आमदार भास्कर जाधव यांनी प्रचारात सक्रिय सहभाग घेतला आहे. मात्र, आघाडीच्या प्रचारात राज्यस्तरीय मोठ्या नेत्यांच्या सभा तुलनेने कमी झाल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे अनेक ठिकाणी स्थानिक नेतृत्वावरच प्रचाराची जबाबदारी पडली आहे. तरीही महाविकास आघाडीने ग्रामीण भागात घरभेटी आणि कार्यकर्ता संपर्कावर भर देत शांत पण सातत्यपूर्ण प्रचार केला आहे.
आज रात्री दहा वाजल्यानंतर जाहीर प्रचारावर बंदी लागू होणार आहे. त्यानंतर उमेदवारांना सभा, मिरवणूक, लाऊडस्पीकर, रॅली यांना परवानगी राहणार नाही. त्यामुळे प्रचाराची दिशा छुप्या प्रचाराकडे वळणार असून घराघरांत जाऊन भेटीगाठी, वैयक्तिक संवाद, फोनद्वारे संपर्क व छोट्या गटांमध्ये चर्चा यावर भर दिला जाणार आहे. लाऊडस्पीकरचा आवाज शांत होईल, मात्र राजकीय हालचाली अंतर्गत पातळीवर अधिक तीव्र होतील.
प्रशासनाने निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पडावी यासाठी सर्व तयारी पूर्ण केली आहे. संवेदनशील मतदान केंद्रांवर अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित केले आहेत. मतदानाच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी विशेष दक्षता घेण्यात येत आहे. जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा व निवडणूक अधिकारी पूर्ण सतर्कतेत असून आचारसंहिता काटेकोरपणे राबवली जात आहे.
जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली आहे. रत्नागिरी तालुक्यात हातखंबा आणि गोळप या दोन गटांमधील लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राजापूर तालुक्यात आमदार किरण सामंत यांची पकड मजबूत असल्याने तेथील लढत महायुतीसाठी महत्त्वाची ठरत आहे. चिपळूण व संगमेश्वर तालुक्यात आमदार शेखर निकम स्वबळावर निवडणुकीला सामोरे जात असून त्यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे. गुहागर तालुक्यात आमदार भास्कर जाधव वर्चस्व टिकवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. दापोली आणि खेड तालुक्यात गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची सरशी असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
मतदारांमध्येही या निवडणुकीबाबत मोठी उत्सुकता दिसून येत आहे. ग्रामीण भागातील तरुण मतदार रोजगार, पायाभूत सुविधा आणि शिक्षणाच्या प्रश्नांकडे लक्ष देत आहेत, तर ज्येष्ठ नागरिक पाणीपुरवठा, आरोग्यसेवा आणि रस्त्यांच्या स्थितीवर भर देत आहेत. महिला मतदार स्वच्छता, अंगणवाडी, आरोग्य सुविधा आणि सामाजिक सुरक्षेच्या मुद्द्यांवर आपली भूमिका ठरवत आहेत. त्यामुळे या निवडणुकीत मतदारांचा कौल कोणत्या बाजूने लागेल, याबाबत अनिश्चितता कायम आहे.
दरम्यान, राज्य सरकारने मतदानाच्या दिवशी कामगारांना भरपगारी सुटी देण्याचा निर्णय घेतला आहे. उद्योग, खनिकर्म, आस्थापना आणि कारखान्यांमधील कामगारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. याचा लाभ रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे एक लाख ऐंशी हजार कामगारांना होणार आहे. लोटे एमआयडीसीसह खेर्डी, खडपोली, दापोली, मिरजोळे, देवरूख, साडवली या औद्योगिक भागांतील कामगारांना मतदानासाठी सवलत मिळणार आहे.
तसेच मतदानाच्या दिवशी जिल्ह्यातील आठवडा बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. गुहागर तालुक्यातील शृंगारतळी, संगमेश्वर तालुक्यातील माखजन, रत्नागिरी तालुक्यातील निवळी आणि रत्नागिरी शहरातील आठवडा बाजार ७ फेब्रुवारी रोजी बंद राहणार आहेत. यामुळे मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडण्यास मदत होणार आहे.
एकूणच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक ही केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक न राहता आगामी राजकीय समीकरणांचे संकेत देणारी लढत ठरली आहे. जाहीर प्रचार संपल्यानंतर आता मतदार शांतपणे विचार करून निर्णय घेतील. ७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मतदानातून रत्नागिरी जिल्ह्याचा कौल कुणाच्या बाजूने लागतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार असून त्याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.