रत्नागिरी, दि. ०६ : कोकणात आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असतानाच शिवसेना नेते व माजी मंत्री रामदास कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. रायगड जिल्ह्यात मंत्री भरत गोगावले आणि खासदार सुनील तटकरे यांच्यात राजकीय संघर्ष सुरू असतानाच आता रामदास कदम यांनीही तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
माध्यमांशी बोलताना रामदास कदम म्हणाले, “लोकसभा निवडणुकीत आम्ही सुनील तटकरे यांना मदत केली. मात्र ते विश्वासघातकी माणूस आहेत. विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी शिवसेनेचे उमेदवार योगेश कदम यांच्या विरोधात काम केले. इतकेच नव्हे तर गुहागर विधानसभा मतदारसंघातून आमदार भास्कर जाधव यांना निवडून आणण्यासाठी त्यांनी मदत केली,” असा घणाघाती आरोप त्यांनी केला.
रामदास कदम यांनी अजित पवार यांच्या निधनानंतर घडलेल्या राजकीय घडामोडींवरही तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, “अजितदादांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा शपथविधी कार्यक्रम अतिशय घाईने करण्यात आला. या प्रक्रियेत ज्येष्ठ नेते शरद पवार यांना विश्वासात घेतले गेले नाही. अजितदादांच्या चितेची राख शांतही झाली नव्हती आणि शरद पवार यांना शह देण्यासाठी हा शपथविधी करण्यात आला,” असा आरोप त्यांनी केला.
तटकरे यांनी विधानसभेत भास्कर जाधव यांना मदत केल्याचा दावा करत कदम म्हणाले, “ज्या शिवसेनेने त्यांना खासदार म्हणून निवडून दिले, त्याच शिवसेनेच्या आमदाराला पाडण्यासाठी तटकरे यांनी प्रयत्न केले. त्यांनी त्यांच्या मुलीच्या डोक्यावर हात ठेवून हे नाकारावे,” असे आव्हानही त्यांनी दिले.
“तटकरे हे तोंडावर गोड बोलतात, पण मागून खंजीर खुपसतात. रायगड जिल्ह्यातील सर्व आमदारांसह मंत्री भरत गोगावले आणि आम्ही लोकसभेत तटकरे यांना मदत केली. मात्र विधानसभेत त्यांनी शिवसेनेच्या विरोधात काम केले. त्यामुळे भविष्यात महाराष्ट्रात आम्ही सुनील तटकरे यांच्यावर कधीही विश्वास ठेवणार नाही,” असेही रामदास कदम यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेच्या विरोधात लढत असल्याबाबत विचारले असता कदम म्हणाले, “आता आम्हाला याची सवय झाली आहे. याचे उत्तर जनता जनार्दन देईल. मात्र या सर्व राजकीय घडामोडींबाबत आम्ही लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन सविस्तर माहिती देणार आहोत.”
दापोली विधानसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप युती न झाल्याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले, “काही लोकांना आगामी निवडणुकीत शिवसेना आणि योगेश कदम यांना संपवून आमदार होण्याची स्वप्ने पडत आहेत. यावर मी अधिक काही बोलणार नाही,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
दरम्यान, ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी रामदास कदम यांच्यावर केलेल्या टीकेलाही कदम यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, “भास्कर जाधव यांचे आता सर्व संपले आहे. आम्हीच त्यांना मदत करून पुन्हा शिवसेनेत आणले. मात्र ते एहसानफरामोश आहेत. त्यामुळे त्यांच्यावर बोलावे इतके ते मोठे राहिले नाहीत,” असे म्हणत त्यांनी विषय संपवला.
रामदास कदम यांच्या या आक्रमक वक्तव्यामुळे कोकणातील राजकारण आणखी तापण्याची शक्यता असून जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील संघर्ष अधिक तीव्र होण्याचे संकेत मिळत आहेत.








