रत्नागिरी, दि. ०७ : रत्नागिरी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज सकाळी ७.३० वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरू झाली. सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान शांततेत पूर्ण झाले. मात्र जिल्ह्यातील अनेक मतदान केंद्रांवर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये (EVM) तांत्रिक बिघाड झाल्याने मतदारांची मोठी गैरसोय झाली. काही ठिकाणी मतदान काही तासांसाठी थांबले, तर अनेक केंद्रांवर लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसून आले. तरीही प्रशासनाच्या तत्परतेमुळे पर्यायी यंत्रे उपलब्ध करून देत मतदान प्रक्रिया पुन्हा सुरळीत करण्यात आली.
प्राथमिक आकडेवारीनुसार जिल्ह्यात सरासरी ५६ ते ५८ टक्क्यांच्या दरम्यान मतदान झाले असून चिपळूण तालुक्यात सर्वाधिक मतदानाची नोंद झाली आहे.
तालुकानिहाय अंदाजे मतदान टक्केवारी पुढीलप्रमाणे —
चिपळूण – ६२.६० टक्के
रत्नागिरी – ५८.५२ टक्के
गुहागर – ५६.५० टक्के
खेड – ५५.२० टक्के
दापोली – ५३.८७ टक्के
मंडणगड – ४८.७९ टक्के
या निवडणुकीत जिल्ह्यातील ५६ जिल्हा परिषद गट व ११२ पंचायत समिती गणांसाठी मतदान झाले. एकूण ११ लाख ७३ हजार ९०२ मतदारांपैकी मोठ्या संख्येने मतदारांनी आपला हक्क बजावला. महिला व पुरुष मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. दुपारनंतर मतदानाचा वेग वाढला.
EVM बिघाडामुळे मतदान प्रक्रियेत अडथळे
जिल्ह्यातील अनेक मतदान केंद्रांवर सकाळपासूनच ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याच्या घटना घडल्या. विशेषतः चिपळूण तालुक्यात परिस्थिती अधिक गंभीर ठरली. तब्बल ४५ मतदान केंद्रांवर मशीन बंद पडल्याची माहिती समोर आली. खेर्डी गटातील चार ते पाच केंद्रांसह शिरगाव, सावर्डे कॉलनी, पिंपळ मोहल्ला, कुडप, गुढेकरवाडी, मांडकी, खरवते, कोंढरताम्हाणे, कापरे, कापसाळ, कळंबस्ते, पेढांबे, पिंपळी, सती-चिंचघरी, कळवंडे व मालघर या गावांमध्ये मतदान प्रक्रिया काही काळ रखडली.
काही केंद्रांवर सकाळी ७.३० वाजता मशीन सुरूच न झाल्याने मतदारांना तासभर ताटकळत उभे राहावे लागले. काही ठिकाणी पर्यायी यंत्रे येईपर्यंत मतदारांनी मतदान केंद्र सोडून परत जाण्याचा मार्ग स्वीकारला. विशेषतः वृद्ध नागरिक, महिला व दिव्यांग मतदारांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.
दापोली तालुक्यातील उटंबर व खेड तालुक्यातील बोरज येथेही ईव्हीएम मशीन बंद पडल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली. काही ठिकाणी मशीन वारंवार बंद होत असल्याने मतदान प्रक्रिया पुन्हा पुन्हा थांबवावी लागली.
रत्नागिरी तालुक्यातील हातखंबा गणातही मतदान यंत्र बिघडल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त झाली. सकाळी तपासणी करूनही काही वेळातच मशीन बंद कशी पडते, असा सवाल उपस्थित करण्यात आला. या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रारी दाखल करण्यात आल्या.
प्रशासनाची तत्परता; राखीव मशीनचा वापर
ईव्हीएम बिघाडाच्या घटनांनंतर निवडणूक प्रशासनाने तातडीने कारवाई केली. प्रत्येक तालुक्यात राखीव ईव्हीएम यंत्रे सज्ज ठेवण्यात आली होती. ज्या ठिकाणी बिघाड झाला तेथे तात्काळ नवीन मशीन पोहोचवून मतदान प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली. निवडणूक विभागाकडून “तांत्रिक अडचणी युद्धपातळीवर दूर करण्यात आल्या असून मतदारांनी शांतता राखावी,” असे आवाहन करण्यात आले.
पोलीस प्रशासनाकडूनही सर्व मतदान केंद्रांवर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. संवेदनशील मतदान केंद्रांवर विशेष लक्ष ठेवण्यात आले. संपूर्ण जिल्ह्यात कुठेही अनुचित प्रकार घडल्याची नोंद नाही.
चिपळूण तालुक्यात सर्वाधिक मतदान
चिपळूण तालुक्यात अंदाजे ६२.६० टक्के मतदान झाले असून जिल्ह्यात सर्वाधिक मतदानाची नोंद येथे झाली आहे. नांदगाव २४/२५ मतदान केंद्रात ५५.९४ टक्के मतदान झाले. मात्र याच तालुक्यात सर्वाधिक ईव्हीएम बिघाडाच्या घटना घडल्याने मतदारांची मोठी गैरसोय झाली.
दरम्यान, चिपळूण तालुक्यात भरारी पथकाने ६८ हजार रुपयांची रोकड जप्त केली. निवडणूक आचारसंहितेच्या अंमलबजावणीदरम्यान ही कारवाई करण्यात आली.
राजापुरात मतदान प्रक्रिया सुरळीत
राजापूर तालुक्यातील सहा जिल्हा परिषद गट व बारा पंचायत समिती गणांसाठी सरासरी ५० ते ५५ टक्के मतदान झाले. तालुक्यातील १९५ मतदान केंद्रांवर सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदान सुरू झाले. सुरुवातीला मतदान संथ गतीने झाले. पहिल्या दोन तासांत १०.९१ टक्के मतदान झाले होते. दुपारी १.३० वाजेपर्यंत ३७.९७ टक्के तर सायंकाळी साडेतीनपर्यंत ४३.८१ टक्के मतदानाची नोंद झाली. काही ठिकाणी मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाला असला तरी नंतर मतदान सुरळीत झाले. सोमवारी आबासाहेब मराठे महाविद्यालयात मतमोजणी होणार आहे.
दापोली तालुक्यात ५३.८७ टक्के मतदान
दापोली तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी उत्साहात मतदान पार पडले. प्रशासनाच्या प्राथमिक माहितीनुसार ५३.८७ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. दोन मतदान केंद्रांवर ईव्हीएममध्ये बिघाड झाला होता, मात्र तत्काळ पर्यायी यंत्रे देण्यात आली. तालुक्यात २१३ मतदान केंद्रांवर कडक पोलीस बंदोबस्त तैनात होता. एकूण ७५,७१७ मतदारांनी आपला हक्क बजावला असून उमेदवारांचे भवितव्य आता मतपेटीत बंद झाले आहे.
लोकप्रतिनिधींनी बजावला मतदानाचा हक्क
राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी खेड तालुक्यातील जामगे येथे कुटुंबासह मतदान केले. यावेळी त्यांच्या मातोश्री ज्योती रामदास कदम, पत्नी श्रेया योगेश कदम तसेच भाऊ शैलेश कदम यांनीही मतदानाचा हक्क बजावला.
माजी मंत्री रामदास कदम यांनीही जामगे येथे मतदान केले.
राजापूरचे आमदार किरण सामंत व त्यांच्या पत्नी सौ. वर्षा सामंत यांनी पाली येथील मतदान केंद्रावर मतदान केले.
रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी जिल्हा परिषद आदर्श विद्यामंदिर, पाली येथे मतदानाचा हक्क बजावला.
नववधूंचा लोकशाहीसाठी आदर्श
रत्नागिरीतील गणेशगुळे येथे पूजा राजेंद्र गुरव या नववधूने लग्नाच्या बोहल्यावर चढण्यापूर्वी मतदान करून लोकशाहीप्रती कर्तव्य बजावले. हातात मेहंदी, अंगावर लग्नाचा पोशाख आणि दागिन्यांनी नटलेली पूजा जेव्हा मतदान केंद्रावर पोहोचली, तेव्हा उपस्थित नागरिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात तिचे स्वागत केले. “लग्नापूर्वी मतदान करणे हे माझे कर्तव्य आहे,” अशी प्रतिक्रिया तिने दिली.
दापोली तालुक्यातील टाळसुरे येथील वृषाली चोगले व जालगाव येथील कांचन गोवले या नववधूंनीही विवाहाच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावून समाजासमोर प्रेरणादायी उदाहरण घडवले. या घटनेची सोशल मीडियावर मोठी चर्चा झाली असून तरुण मतदारांसाठी हा संदेश प्रेरणादायी ठरला आहे.
शांततेत मतदान संपन्न; मतमोजणीकडे लक्ष
संपूर्ण जिल्ह्यात मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. कुठेही मोठा अनुचित प्रकार घडल्याची नोंद नाही. काही ठिकाणी तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या असल्या तरी प्रशासनाने त्या वेळीच दूर केल्या.
आता सोमवारी होणाऱ्या मतमोजणीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या ५६ गट व ११२ गणांमध्ये कोण बाजी मारणार, कोण पराभूत होणार, याचा फैसला मतपेटीत बंद झाला आहे. निवडणूक निकालातून जिल्ह्यातील राजकीय समीकरणे स्पष्ट होणार असून सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये निकालाबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
लोकशाहीच्या या उत्सवात अनेक अडचणी असूनही मतदारांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवून लोकशाहीवरील विश्वास अधोरेखित केला आहे. आता सर्वांचे लक्ष सोमवारी जाहीर होणाऱ्या निकालाकडे लागून राहिले आहे.








