दापोली, दि. १४ : पावसाळी वातावरण आणि महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाच्या सूचनांनुसार कोकणातील विविध ठिकाणांच्या रात्रीच्या विशेष (जादा) फेरीबोट सेवा तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवण्याचा निर्णय सुवर्णदुर्ग शिपिंग अँड मरीन सर्व्हिसेस प्रा. लि. यांनी घेतला आहे. या निर्णयामुळे दाभोळ– धोपावे, जयगड– तवसाळ आणि वेसवी– बागमंडले या मार्गांवरील रात्रीची अतिरिक्त फेरी सेवा काही काळासाठी उपलब्ध राहणार नाही.
कंपनीने प्रसिद्ध केलेल्या सूचनेनुसार, १५ जून ते ३१ जुलै या कालावधीत संबंधित मार्गांवरील रात्रीच्या वेळेतील जादा फेऱ्या पूर्णपणे बंद राहतील. पावसाळ्यात समुद्र आणि खाड्यांमधील बदलते हवामान, वाढलेला वारा तसेच प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विचार करून हा निर्णय घेण्यात आल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
कोकणातील दाभोळ–धोपावे, जयगड–तवसाळ आणि वेसवी–बागमंडले हे फेरीबोट मार्ग स्थानिक नागरिक, व्यावसायिक, पर्यटक तसेच मालवाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. विशेषतः रात्रीच्या जादा फेऱ्यांमुळे प्रवाशांना मोठी सुविधा उपलब्ध होत होती. मात्र, पावसाळ्यात उद्भवणारे संभाव्य धोके लक्षात घेऊन ही सेवा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे.
दरम्यान, नियमित वेळापत्रकानुसार सुरू असलेल्या इतर फेरी सेवांबाबत स्वतंत्र सूचना लागू राहतील. त्यामुळे प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करताना या बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन कंपनीकडून करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी प्रवाशांनी सुवर्णदुर्ग शिपिंग अँड मरीन सर्व्हिसेस प्रा. लि. यांच्या ९७६७२४८९०० या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा, असेही कंपनीने म्हटले आहे.








