नवी दिल्ली, दि. १३ : देशातील लोकसभा मतदारसंघांच्या परिसीमनाबाबत मोठी चर्चा सुरू झाली असून, पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या (EAC-PM) एका अभ्यासपत्रात लोकसभा जागांची संख्या सध्याच्या ५४३ वरून ८२४ पर्यंत वाढवण्याची शिफारस करण्यात आली आहे. या प्रस्तावामुळे महाराष्ट्रासह अनेक राज्यांतील लोकसभा मतदारसंघांची रचना बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांनंतर बदललेल्या राजकीय परिस्थितीत केंद्र सरकार पुन्हा एकदा परिसीमनाशी संबंधित विधेयक संसदेत आणण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर EAC-PM च्या सदस्य शमिका रवी आणि इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटचे सदस्य मुदित कपूर यांनी तयार केलेल्या ‘वर्किंग पेपर’ने राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले आहे.
१७० मोठ्या मतदारसंघांचे विभाजन
अभ्यासपत्रानुसार, लोकसभा जागांची संख्या वाढवण्यासाठी देशातील सर्व ५४३ मतदारसंघांची फेररचना करण्याची आवश्यकता नाही. त्याऐवजी देशातील सर्वात मोठ्या १७० लोकसभा मतदारसंघांचे विभाजन करण्याचा प्रस्ताव आहे.
यामध्ये –
- ५९ मतदारसंघांचे दोन भागांमध्ये विभाजन
- १११ मतदारसंघांचे तीन भागांमध्ये विभाजन
करण्याची शिफारस करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात २४ नवीन जागांची भर?
प्रस्तावित मॉडेलनुसार महाराष्ट्रातील १२ मोठ्या लोकसभा मतदारसंघांचे प्रत्येकी तीन भागांमध्ये विभाजन होऊ शकते. त्यामुळे राज्यातील लोकसभा मतदारसंघांची संख्या ४८ वरून ७२ पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. म्हणजेच महाराष्ट्राला तब्बल २४ अतिरिक्त लोकसभा जागा मिळू शकतात.
महिलांच्या आरक्षणाला मदत
या मॉडेलमुळे लोकसभेत महिलांसाठी लागू करण्यात आलेल्या ३३ टक्के आरक्षणाची अंमलबजावणी अधिक सुलभ होईल, असे अभ्यासपत्रात नमूद करण्यात आले आहे. तसेच नव्या मतदारसंघ रचनेमुळे मतदानाचा टक्का ०.३ ते २.३ टक्क्यांनी वाढू शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यामुळे देशभरात ९० लाख ते २.३ कोटी नवीन मतदार मतदान प्रक्रियेत सहभागी होऊ शकतात.
बदललेल्या राजकीय समीकरणांचा परिणाम
यापूर्वी परिसीमनासंदर्भातील प्रस्तावाला तृणमूल काँग्रेस आणि द्रमुकसारख्या पक्षांनी विरोध केला होता. मात्र अलीकडील निवडणुकांनंतर बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे केंद्र सरकारला संसदेत आवश्यक पाठबळ मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे परिसीमनाचा मुद्दा पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.
प्रस्तावित वाढ : कोणत्या राज्याला किती जागा?
EAC-PM च्या मॉडेलनुसार काही प्रमुख राज्यांतील लोकसभा जागांची संभाव्य संख्या पुढीलप्रमाणे –
| राज्य | सध्याच्या जागा | प्रस्तावित जागा |
|---|---|---|
| उत्तर प्रदेश | ८० | १२० |
| महाराष्ट्र | ४८ | ७२ |
| बिहार | ४० | ६० |
| तामिळनाडू | ३९ | ५९ |
| मध्य प्रदेश | २९ | ४४ |
| कर्नाटक | २८ | ४२ |
| गुजरात | २६ | ३९ |
| राजस्थान | २५ | ३८ |
| केरळ | २० | ३० |
| तेलंगणा | १७ | २६ |
अद्याप अंतिम निर्णय नाही
दरम्यान, हा प्रस्ताव सध्या केवळ अभ्यासपत्रातील शिफारस असून केंद्र सरकारने याबाबत कोणताही अंतिम निर्णय जाहीर केलेला नाही. परिसीमनासाठी संसदीय प्रक्रिया, विधेयक मंजुरी आणि निवडणूक आयोगाच्या पुढील कार्यवाहीची आवश्यकता असणार आहे. मात्र, या शिफारशीमुळे देशातील आगामी राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम होऊ शकतो, अशी चर्चा सुरू झाली आहे.








