राज्यस्तरीय ग्रामीण, कृषी व सहकार साहित्य संमेलनाच्या लोगोचे मालगुंड येथे अनावरण

१३, १४ व १५ फेब्रुवारी २०२६ रोजी राज्यस्तरीय ग्रामीण, कृषी व सहकार मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन

रत्नागिरी, दि. ०८ : कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था, मांडकी पालवण यांच्या वतीने दि. १३, १४ व १५ फेब्रुवारी २०२६ रोजी राज्यस्तरीय ग्रामीण, कृषी व सहकार मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या साहित्य संमेलनाच्या लोगोचे अनावरण आज कवी केशवसुत स्मारक, मालगुंड (ता. संगमेश्वर) येथे उत्साहात पार पडले.

महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा रत्नागिरीच्या अध्यक्षा व रत्नागिरी नगर परिषदेच्या नगराध्यक्षा मा. सौ. शिल्पाताई सुर्वे यांच्या हस्ते या लोगोचे अनावरण करण्यात आले. ग्रामीण, कृषी व सहकार या ग्रामीण जीवनाशी निगडित असलेल्या तीन महत्त्वाच्या विषयांवर आधारित साहित्य संमेलन महाराष्ट्रात प्रथमच भरविले जात असून, हा उपक्रम साहित्यविश्वासाठी ऐतिहासिक ठरणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. ग्रामीण जीवनाचे प्रश्न, शेती, सहकार चळवळ आणि त्यातून उभे राहणारे सामाजिक वास्तव साहित्याच्या माध्यमातून मांडले जाणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

या साहित्य संमेलनासाठी राज्यभरातील साहित्यिक, विचारवंत, अभ्यासक तसेच साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले. मांडकी पालवण येथे होणारे हे संमेलन ग्रामीण भागातील साहित्य चळवळीला नवे बळ देणारे ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

यावेळी रत्नागिरी नगर परिषदेच्या नगराध्यक्षा पदावर निवड झाल्याबद्दल मा. सौ. शिल्पाताई सुर्वे यांचा साहित्य संमेलनाच्या संयोजन समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. या सत्काराला त्यांनी कृतज्ञतापूर्वक स्वीकार करत साहित्य, समाज आणि प्रशासन यांचा समन्वय साधून ग्रामीण संस्कृतीचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचे कार्य करावे लागेल, असे मत व्यक्त केले.

या कार्यक्रमास मालगुंड गावच्या सरपंच मा. सौ. श्वेता थेऊर, साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे, नियोजन समिती अध्यक्ष प्रकाश देशपांडे, प्रमुख कार्यवाह निखिल चोरगे, कोषाध्यक्ष अजय चव्हाण तसेच कवी केशवसुत स्मारकाच्या कार्यवाह नलिनी खेर यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी संमेलनाच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट करत ग्रामीण साहित्य चळवळीचा विस्तार करण्यासाठी हे संमेलन महत्त्वाचे ठरणार असल्याचे मत व्यक्त केले.

कवी केशवसुत स्मारकासारख्या ऐतिहासिक व साहित्यिक महत्त्व असलेल्या स्थळी लोगोचे अनावरण होणे ही बाब प्रेरणादायी असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमास परिसरातील मोठ्या संख्येने साहित्यप्रेमी उपस्थित होते. लोगो अनावरण सोहळ्यामुळे येणाऱ्या राज्यस्तरीय ग्रामीण, कृषी व सहकार मराठी साहित्य संमेलनाबाबत उत्सुकता आणि सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.

कार्यक्रमाच्या शेवटी पुन्हा एकदा मा. शिल्पाताई सुर्वे यांनी मांडकी पालवण येथे होणाऱ्या साहित्य संमेलनास सर्व साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करत या साहित्य महोत्सवात सहभागी होण्याचे निमंत्रण दिले.

आणखी वाचा