रत्नागिरी, दि. ०८ : हातखंबा मार्गावरील गयाळवाडी फाटा येथे डंपर आणि कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात कारमधील तीन महिला जखमी झाल्या. ही घटना रविवारी (दि. ८ फेब्रुवारी) दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास घडली असून अपघातामुळे काही काळ वाहतूकही विस्कळीत झाली होती.
या अपघातात स्वरांगी सुरेश पवार (वय ४५), मंजिरी मकरंद परकर (वय ३०) आणि सरोजनी दाजी पवार (वय ६८, रा. आरवली, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) या तीन महिला जखमी झाल्या आहेत. स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांना तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सुदैवाने तिघांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे समजते.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, डंपर (एमएच-०८ बीके ४९७७) हा रत्नागिरीहून हातखंबा दिशेने जात असताना गयाळवाडी फाटा येथे समोरून येणाऱ्या कारला जोराची धडक बसली. या धडकेत कारचा पुढील भाग पूर्णपणे चेंदामेंदा झाला असून वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. अपघात इतका जोरदार होता की परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
अपघाताची माहिती मिळताच ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक टेमकर आणि पोलिस कर्मचारी राजेंद्र सावंत घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थितीचा पंचनामा करून वाहतूक सुरळीत केली. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, वाहनांच्या वेगावर नियंत्रण नसणे किंवा चालकाचा अंदाज चुकणे यामुळे हा अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. वारंवार या मार्गावर अपघात होत असल्याने गयाळवाडी फाटा परिसरात वाहतूक सुरक्षेच्या उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.








