साप्ताहिक ‘प्रकट महाराष्ट्र’चे संपादक दत्ताराम दळवी यांना ‘जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित

आम्ही वडाळा पूर्वकर या संस्थेमार्फत वडाळा विभाग काँग्रेसच्या अध्यक्षा- अक्षता मोहिते यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला

मुंबई, दि. १० : समाजाच्या सेवेसाठी गेली तब्बल ५० वर्षे अविरत कार्य करणारे साप्ताहिक ‘प्रकट महाराष्ट्र’चे संपादक दत्ताराम दळवी यांना ‘जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार ‘आम्ही वडाळा पूर्वकर’ या संस्थेच्या वतीने वडाळा विभाग काँग्रेसच्या अध्यक्षा अक्षता मोहिते यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

आपण ज्या समाजात राहतो, त्या समाजाचे आपण देणे लागतो, या भावनेतून दत्ताराम दळवी यांनी समाजकार्याची वाट निवडली. गेल्या पाच दशकांपासून ते गाव, समाज, नातेसंबंधी, गरजू व पीडित घटकांसाठी विविध प्रकारे सेवा देत आहेत. गरिब, अडचणीत असलेल्या नागरिकांना मदत करणे, त्यांच्या समस्या शासनदरबारी पोहोचवणे आणि सामाजिक प्रश्नांवर लेखणीद्वारे प्रकाश टाकणे हे त्यांचे जीवनकार्य ठरले आहे.

याच उद्देशाने त्यांनी ‘प्रकट महाराष्ट्र’ हे साप्ताहिक सुरू करून सामाजिक, शैक्षणिक व मानवी मूल्यांवर आधारित लेखनातून पीडितांच्या समस्या मांडल्या. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत ‘आम्ही वडाळा पूर्वकर’ संस्थेने त्यांना ‘जीवन गौरव’ पुरस्काराने गौरवून प्रोत्साहन दिले. यावेळी इतर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजसेवकांचाही सन्मान करण्यात आला.

‘आम्ही वडाळा पूर्वकर’ संस्थेच्या सामाजिक उपक्रमांचीही यावेळी माहिती देण्यात आली. संस्थेने पनवेल तालुक्यातील नेरे गावातील वृद्धाश्रमाला भेट देऊन वृद्धांच्या उपयोगी वस्तूंचे वाटप केले आहे. तसेच अनेक शाळांमध्ये शालेय साहित्य वाटप करून शैक्षणिक सहाय्य केले आहे. अपयशातून यश जन्माला येते, अनुभवातून ज्ञान व कौशल्य प्राप्त होते, या विचारांवर विश्वास ठेवत संस्था समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबवत आहे.

संस्थेला कोणतीही आर्थिक मदत नसतानाही वडाळा येथील स्मशानभूमीतील कामगारांच्या कार्याची दखल घेऊन स्मशानभूमीतच विशेष कार्यक्रमाचे आयोजन करून त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. समाजकार्य करताना येणाऱ्या अडचणी, विरोध आणि संघर्ष स्वीकारत संस्था निरंतर सेवाभावाने कार्यरत आहे.

या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यामध्ये NDTV वाहिनीचे पत्रकार सुधाकर काश्यप, संगीतकार युसुफ दरबार, नेत्रतज्ज्ञ डॉ. मेखला नाईक, नगरसेविका सुफियान बानू, असुंता डिसोझा, हेमलता सदाशिवम, फादर ब्रास्टीन, मिताली तांबे, प्रकाश कनावजे, कृष्णाजी कोल्हे, शिवाजी गावडे, साहित्यिक रमेश आव्हाड, आनंद प्रभू, चंद्रकांत जाधव, कोठारी मॅडम तसेच स्मशानभूमीचे ज्येष्ठ कर्मचारी मोईनउद्दीन अब्बास यांचा समावेश होता.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकाशवाणी निवेदक उमेश सावंत यांनी अलंकारिक शब्दांत प्रभावीपणे केले. समाजसेवक दत्ताराम दळवी यांच्या कार्याचा गौरव करत उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या सामाजिक योगदानाचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

आणखी वाचा