चिपळूण, दि. २४ : राष्ट्रसंत, वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त संत गाडगेबाबा परिट समाज संस्था, रत्नागिरी यांच्या वतीने जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा बक्षीस समारंभ संस्थेचे अध्यक्ष पत्रकार सुभाष कदम यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी पेठमाप येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर सभागृहात उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन उपाध्यक्ष वसंत पिंपळकर यांच्या पुढाकाराने करण्यात आले.
शालेय गट (इयत्ता आठवी ते दहावी) मध्ये सार्थक वैभव कदम (पेठमाप, चिपळूण) यांनी प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक सार्थक प्रकाश महाडिक (भेलसई, खेड) तर तृतीय क्रमांक अंतरा अशोक इंगवले (बुरंबाड, संगमेश्वर) यांनी मिळविला. पूर्वी विवेक कदम, नीरजा नितीन कदम आणि प्रांजल योगेश चाळके यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली.
महाविद्यालयीन गटात श्लोका नवनीत भोसले (खेड) प्रथम, रिया अशोक चाळके (गोविळ, लांजा) द्वितीय आणि आर्या निलेश चाळके (पाटपन्हाळे, गुहागर) तृतीय ठरल्या. प्रतिक्षा दीपक कदम व सई संजय मिरगांवकर यांना उत्तेजनार्थ पारितोषिके प्रदान करण्यात आली.
स्पर्धेचे परीक्षण प्रा. विनायक होमकळस यांनी केले. त्यांच्या योगदानाबद्दल त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अभिनंदन करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. कचेश्वर राऊत, सल्लागार आबा महाडिक, हसमुख पांगारकर तसेच संस्थेचे विविध पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे खुमासदार सूत्रसंचालन सौ. अंजली पिंपळकर यांनी केले तर आभार प्रदर्शन रितेश महाडिक यांनी केले.
या कार्यक्रमामुळे संत गाडगेबाबांच्या विचारांचा प्रसार होत असून समाजात स्वच्छता, सेवा आणि शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित झाले, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.








