चिपळूण, दि. २४ : थोर समाजसुधारक, वैराग्यमूर्ती राष्ट्रसंत श्री संत गाडगेबाबा हे केवळ एखाद्या समाजाच्या उन्नतीसाठी नव्हे तर संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी कार्य करणारे महान व्यक्तिमत्त्व होते, असे प्रतिपादन महाराष्ट्र परिट (धोबी) सेवा मंडळाचे राज्य सचिव प्रा. कचेश्वर राऊत यांनी केले. संत गाडगेबाबा परिट समाज संस्था, रत्नागिरी यांच्या वतीने चिपळूण येथील पेठमाप विठ्ठल–रुक्मिणी मंदिर सभागृहात आयोजित संत गाडगेबाबांच्या 150 व्या जयंती समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
प्रा. राऊत म्हणाले की, संत गाडगेबाबांनी समाजातील अज्ञान, अस्वच्छता, अंधश्रद्धा, व्यसनाधीनता, हुंडा प्रथा व अनिष्ट चालीरीतींविरोधात आयुष्यभर संघर्ष केला. लोकांनी शिक्षण घ्यावे, स्वतःचा बौद्धिक विकास करावा, हा त्यांचा मुख्य संदेश होता. आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी समाजप्रबोधन केले. साध्या भाषेत, विनोद आणि उदाहरणांच्या साहाय्याने त्यांनी लोकांच्या मनावर प्रभाव टाकला. म्हणूनच संत गाडगेबाबा हे लोकशिक्षणाचे चालते-बोलते विद्यापीठ होते. त्यांचे विचार आजच्या तरुण पिढीने आत्मसात करणे अत्यंत आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे दुसरे प्रमुख वक्ते पूज्य गांधी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. विनायक होमकळस यांनी सांगितले की, संत गाडगेबाबा निरक्षर होते, तरी त्यांनी आयुष्यभर शिक्षणाचा ध्यास घेतला. त्यांनी स्वतःच्या नावाने आश्रम, मठ किंवा संस्थांची स्थापना केली नाही. “मी कुणाचा गुरु नाही, माझा कुणी चेला नाही,” असे ते सांगत असत. त्यांनी आपले संपूर्ण जीवन समाजसेवेस अर्पण केले. महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आचार्य अत्रे, पंजाबराव देशमुख यांसारख्या थोर व्यक्तींनी त्यांच्या कीर्तनाचा अनुभव घेतला होता, हे त्यांनी आवर्जून नमूद केले.
प्रा. होमकळस यांनी संत गाडगेबाबांच्या कीर्तनशैलीचे वैशिष्ट्य सांगताना नमूद केले की, त्यांच्या कीर्तनात प्रश्नोत्तराच्या माध्यमातून समाजातील दोष उघड केले जात. अंधश्रद्धा, कर्मकांड आणि विषमता यावर त्यांनी निर्भीडपणे प्रहार केला. सामान्य माणसाला समजेल अशा भाषेत ते विवेचन करत असत. त्यामुळे त्यांचे कीर्तन केवळ धार्मिक नसून सामाजिक प्रबोधनाचे प्रभावी साधन ठरले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी संत गाडगेबाबांच्या पुतळ्यास प्रा. कचेश्वर राऊत यांनी पुष्पहार अर्पण केला. अध्यक्ष पत्रकार सुभाष कदम, प्रा. विनायक होमकळस, सल्लागार आबा महाडिक, दीपक कदम, सौ. सावित्री होमकळस व कार्याध्यक्ष मनोज शिंदे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी “गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला” असा जयघोष करण्यात आला.
अध्यक्षीय भाषणात पत्रकार सुभाष कदम यांनी सांगितले की, संत गाडगेबाबा हे स्वच्छता, मानवता, विवेकवाद आणि सामाजिक समतेचे प्रतीक होते. त्यांचे जीवन सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी समर्पित होते. संस्थेच्या माध्यमातून समाजहिताचे उपक्रम राबवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
150 व्या जयंतीनिमित्त उपाध्यक्ष वसंत पिंपळकर यांच्या पुढाकाराने जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षिसे व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. तसेच महिला जिल्हाध्यक्षा अंजली पिंपळकर यांच्या पुढाकाराने हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमास संस्थेचे पदाधिकारी, समाजबांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे खुमासदार सूत्रसंचालन महिला जिल्हाध्यक्षा सौ. अंजली पिंपळकर यांनी केले, तर सर्व देणगीदार व उपस्थितांचे आभार लॉंड्री सचिव रितेश महाडिक यांनी मानले.








