रत्नागिरी, दि. २६ फेब्रुवारी : कोकम करी रेस्टॉरंट प्रस्तुत रत्नागिरी पाककला महास्पर्धा अंबर हॉल येथे मोठ्या उत्साहात पार पडली. कोकणातील समृद्ध, पारंपरिक व लुप्त होत चाललेल्या पाककृतींचा वारसा जपण्याच्या उद्देशाने आयोजित या स्पर्धेत सौ. प्रज्ञा जयंत फडके (रा. जांभुळआड) यांनी सादर केलेली ‘कायनाचं पिठलं’ ही शिवकालीन व लुप्त पाककृती सर्वोत्कृष्ट ठरली. त्यांना अंतिम महाविजेते (सर्व श्रेणीतून प्रथम) म्हणून घोषित करण्यात आले.
या स्पर्धेत दापोली, गुहागर, चिपळूण, संगमेश्वर, राजापूर तसेच रत्नागिरी शहर परिसरातून मोठ्या संख्येने स्पर्धकांनी सहभाग घेतला. परीक्षक म्हणून हॉटेल कार्निव्हलचे संचालक उदय लोध, रस्टिक हॉलिडेजच्या संचालिका सौ. शिल्पा करकरे आणि नवनिर्माण हॉटेल मॅनेजमेंटच्या प्रा. शेफ मेघना शेलार यांनी काम पाहिले.
स्पर्धेच्या पहिल्या फेरीत १५० रेसिपींची नोंदणी झाली होती. त्यापैकी ७५ रेसिपी अंतिम फेरीसाठी निवडण्यात आल्या. अंतिम फेरीत ७५ महिला स्पर्धकांनी परीक्षकांसमोर लाईव्ह पाककला सादर केली. सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत पारंपरिक, नाविन्यपूर्ण आणि घरगुती चवींचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला. चव, सुगंध, पोत, साहित्य, कृती, स्वच्छता व सादरीकरण या निकषांवर परीक्षण करण्यात आले.
बक्षीस वितरण समारंभ रत्नागिरी जिल्हा हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष रमेश कीर यांच्या उपस्थितीत झाला. या वेळी नमिता कीर, श्वेता काळोखे, महेश सावंत, उमेश (भाई) वायंगणकर, जयेश पटेल, श्रेयश सावंत, डॉ. नितीन सनगर, रश्मीन दुर्वे, नितीन करकरे व अमोल मोरे यांच्या हस्ते स्पर्धकांना सन्मानचिन्हे व प्रशस्तीपत्र देण्यात आली. सर्व स्पर्धकांना सुहाना मसालेकडून भेटवस्तू देण्यात आली, तर राघव एंटरप्रायझेसकडून अंतिम महाविजेत्यास विशेष भेट व सर्वांना खरेदीवर ३० टक्के सवलतीचे कुपन देण्यात आले.
स्पर्धेतील विजेते :
शाकाहारी – प्रथम: सौ. श्रावणी संतोष मयेकर (चोळक्या भाकरी व हिंग चटणी), द्वितीय: सौ. सुलभा फणसळकर (खतखत), तृतीय: सौ. विद्या शिर्के (ओल्या नारळाचे गोड वडे).
मत्स्याहारी – प्रथम: सौ. मीनाक्षी आतिष कीर (खेकडा भुर्जी), द्वितीय: सौ. अंतरा कळंबटे (पानगा मासा), तृतीय: सौ. अवंतिका तिवरेकर (झटपट मुळ्याचं कुवल).
मांसाहारी – प्रथम: सौ. स्वप्नाली संजय भागवत (मातीच्या भांड्यातील काळं चिकन), उत्तेजनार्थ: सौ. साक्षी चव्हाण (कुळथाची थाळी), सौ. संगिता आंबेरकर (भरला बोंबील फ्राय).
अध्यक्षीय भाषणात रमेश कीर यांनी जुन्या पाककृतींचा दस्तावेज तयार करण्याची गरज व्यक्त केली. ही स्पर्धा केवळ स्पर्धा नसून कोकणच्या पारंपरिक चवींचा व संस्कृतीचा उत्सव ठरल्याचे आयोजकांनी सांगितले.








