ध्वनी, शब्द आणि संस्कार : मातृभाषेच्या अभिजाततेचा शोध

मराठी भाषेला अभिजात दर्जा शासनाने हल्लीच दिला आहे ही अतिशय आनंदाची गोष्ट असली तरी मला वाटतं की मराठी ही मुळातच अभिजात भाषा आहे तिला कुठल्याही प्रमाणपत्राची गरज नाही.

ज्या दिवशी ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेच्या अनुवाद मराठी भाषेत केला त्याच दिवशी मराठी भाषा ही जागतिक स्तरावर अभिजात झाली होती.
ज्या दिवशी संत तुकारामांची गाथा ही इंद्रायणी तरली त्याच दिवशी मराठी भाषा अभिजात झाली होती. कागदावर लिहिलेले अभंग इंद्रायणीत उडालीही असतील मात्र मराठी माणसाच्या काळजात आणि मुखावर ते कायम जिवंत राहिले हे आहे अभिजात भाषेचं अस्सल थोरपण.

असं असताना देखील मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्याचा मूळ उद्देश काय तर मराठी भाषेचे संवर्धन होणे अतिशय महत्त्वाचे आहे. मात्र केवळ भाषेचा उदो उद करणे आणि गौरव गीत गाणे म्हणजे मराठी भाषा गौरव दिन साजरा करणे नव्हे. ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांची जयंती किंवा पुण्यतिथी आपण साजरी करतो ही केवळ त्यांचा जय जयकार किंवा त्यांचे महती टिकून राहावी म्हणून नाही. तर शिवाजी महाराजांचे गुण त्यांची तत्व त्यांची मराठी मुलखावरील निष्ठा, त्यांचे राजकारण त्यांच्यातील संयम त्यांच्या अंगातील नेतृत्व गुण त्यांचा युक्तिवाद हे सगळं काही आत्मसात केलं तरच कोणत्याही महापुरुषाची जयंती पुण्यतिथी साजरा करण्यात अर्थ आहे.

अगदी त्याचप्रमाणे मराठी भाषेचा इतिहास संस्कृती ती काळाच्या विविध टप्प्यामध्ये कशा पद्धतीने विकसित झाली तिचा प्रसार कोणत्या पद्धतीने होत गेला आणि ती टिकून राहणे हे का महत्त्वाचा आहे याचा अभ्यास करणे हे खऱ्या अर्थाने गौरव दिन साजना करणे आहे असं मला वाटतं.

भाषा इंग्रजी असो किंवा मराठी किंवा अन्य कुठलीही प्रत्येक भाषेचा एक वेगळा लिहायचा असतो एक वेगळी गोळी असते आणि एक वेगळी संपन्नता असते. यामध्ये सगळ्यात मोठी भूमिका असते ती म्हणजे त्या भाषेतील व्याकरणाची. कोणत्याही भाषेतील शब्द कसे तयार झाले आणि ते कशा पद्धतीने वापरले जातात हे समजून घेणे म्हणजे ती भाषा समजून घेण आहे. त्यासाठी आपण मराठी हिंदी आणि इंग्रजीतील काही उदाहरणे समजून.

तानुल्या बाळाचा गौरवर्ण आणि काळे कुळकुळीत जावळ पाहिले की मातेला आपोआपच पान्हा फुटला. पाण्या फुटने या शब्दाची ची गोडी मराठी भाषेत आहे ती तर कुठल्याच भाषेत नाही. हा पाना फक्त मराठी भाषेलाच फुटू शकतो. त्याचबरोबर हिंदी भाषेतला असाच माझा एक आवडता शब्द आहे तो म्हणजे सुकून. चुकून हा शब्द वापरल्यानंतर मनात जी काही शांतता पसरते ती शांतता तो गारवा इतर कुठल्याही भाषेतल्या कुठल्या शब्दाने पसरू शकत नाही. आहे ना गंमत…
प्रत्येक भाषेची तिची वेगळी अशी एक वैशिष्ट्य एक वेगळी खासियत असते. त्यासाठी त्या भाषेतील शब्दांचा गर्भार्थ आणि त्यामागे दडलेलं व्याकरण समजून घेणे अतिशय महत्त्वाचं असतं.

आता इंग्रजी भाषा बद्दल..

इंग्रजीमध्ये ‘ हेअर ‘ आणि ‘ लिसन ‘ हे एकाच अर्थाचे दोन भिन्न शब्द आहेत. व्याकरणात हे दोन्ही शब्द एकमेकांचे समानार्थी म्हणून वापरले जात असले तरी वाक्यामध्ये होणारा त्यांचा प्रत्यक्ष वापर मात्र वेगवेगळ्या कारणांसाठी होतो. वरवर एकसारख्या वाटणाऱ्या या दोन शब्दांची तीव्रता व त्यानुसार प्रकट होणारे त्यांचे अर्थ यात कमलीचा फरक आहे. ऐकणे ही दोन्ही क्रियांमधील एक सामान्य प्रक्रिया असली तरी ‘ हेअर ‘ म्हणजे ऐकू येणे किंवा कानावर पडणे; आणि लिसन म्हणजे काळजीपूर्वक, एखादी गोष्ट ऐकून घेणे किंवा ती समजून घेण्याच्या उद्देशाने लक्षपूर्वक ग्रहण करणे. एखादी कृती घडणे आणि ती जाणीवपूर्वक घडवून आणणे हा यातला मुख्य फरक आहे. इथे हे सविस्तर उलगडून सांगण्यामागचा हेतू म्हणजे कानावर पडणारा कोणता आवाज ऐकला जातो आणि कोणता ग्रहण केला जातो हे समजून घेणे.

असं म्हणतात की हजारो लाखो वर्षाच्या निरंतर वातावरणीय प्रक्रियेनंतर या विश्वाची निर्मिती झाली ती ध्वनीच्या माध्यमातून. मात्र ध्वनी लहरींना प्रवास करण्यासाठी हवा, पाणी या सारख्या माध्यमाची गरज असते. त्यामुळे जिथे वातावरण आहे तिथेच ध्वनीकंपनं काहीतरी निर्मिती करू शकतात, निर्वात पोकळीत नाही. यातल्या सत्य व तथ्यावर भर न देता त्यावर विश्वास ठेवला तर इथे केवळ हा विचार मांडणे महत्त्वाचे वाटते की ध्वनी, नाद, स्वर यांमध्ये किती प्रचंड ताकत असू शकते.

भाषेचे महत्व सांगणारे दुसरे महत्त्वाचे उदाहरण म्हणजे लहान मुल. मुल जसं आईचा स्पर्श ओळखतं तसंच ते त्याच्या आईचा आवाजही ओळखतं. याच अनुषंगाने अजून एक मुद्दा नमूद करावा वाटतो तो मातृभाषेतील शिक्षण. व्यवहारासाठी मातृभाषा सोपी त्यामुळे मातृभाषेत शिक्षण घेणे अनेकांना सोयीस्कर वाटते; तर काहींना सर्वांगीण विकासासाठी. मात्र तत्पूर्वी मातृभाषा म्हणजे नक्की काय? हे समजून घेणे गरजेचे आहे.

माझ्या परिचयात अनेक आंतरजातीय, आंतरप्रांतीय, आंतरदेशीय विवाह झालेली जोडपी आहेत; ज्यांची पाच ते सहा वर्षाखालील मुलं आई आणि वडील दोघांच्याही कुटुंबात बोलली जाणारी भाषा उत्तम प्रकारे बोलतात. शिवाय आजूबाजूच्या परिसरात, मित्रांमध्ये, शाळेमध्ये, टी. व्ही. चॅनलवर बोलल्या जाणाऱ्या निरनिराळ्या भाषेतही त्यांना सहज व्यक्त होता येतं. मात्र एक गोष्ट मला नेहमी अचंबित करते. ती म्हणजे जेव्हा ही मुलं अतिआनंदी किंवा दुःखी असतात तेव्हा उत्साह, तीव्र वेदना, टोकाचा संताप, द्वेष यांसारख्या उत्कट भावनांचा स्फोट होतो. अशावेळी मात्र नकळतपणे ते त्यांच्या आईकडून मिळालेल्या भाषेत म्हणजे खऱ्या अर्थाने मातृभाषेत व्यक्त होतात.

याचं कारण आहे मेंदूने विकासाच्या सुरुवातीच्या टप्प्यात केलेले ग्रहण, मणन, चिंतन. जन्मापासून ऐकलेले आई ज्या भाषेत बोलते ते शब्द.

मेंदूवर ठसा उमटवणारे आणि कायम स्मरणात राहणारे हे उच्चारण म्हणजे श्रवणशक्तीचा अलौकिक आविष्कार आहे. त्यामुळे मराठी साहित्याचा अभ्यास करणे मराठी भाषेत वाचन करणे जितका महत्त्वाचा आहे तितकच मराठी भाषा कानावर पडणं देखील महत्त्वाच आहे. आपल्या संतांनी मराठी भाषेत लिहिले गेलेले अभंग गारुड श्लोक यांच श्रवण देखील महत्त्वाच आहे.

मराठी भाषा आपल्यासाठी का महत्त्वाची आहे हे जाणून घेताना त्यापूर्वी मातृभाषा म्हणजे नक्की काय हे समजावून घेऊ ?

मातृभाषा म्हणजे केवळ एखाद्या जनसमुदायाची किंवा विशिष्ट भौगोलिक क्षेत्रात बोलली जाणारी विशिष्ट बोलीभाषा नव्हे. जशी महाराष्ट्राची मराठी, गुजरातची गुजराती. तिला आपण स्थानिक भाषा किंवा फार फार तर राज्यभाषा म्हणू शकतो. मायदेशी बोलली जाणारी मायबोलीही म्हणू शकतो. मातृभाषेचा मला उलगडलेला योग्य अर्थ म्हणजे मातेने तिच्या बालकाशी त्याच्या जन्मापासून साधलेल्या संवादातून त्याला उमजलेल्या शब्द, अर्थ, ध्वनी, उच्चारांचा संच.

एक नवजात मूल जास्तीत जास्त वेळ त्याच्या आईच्या सहवासात घालवतं. त्याचा अधिकतर संवाद त्याच्या मातेशी होत असतो. किंबहुना ते मुल गर्भाशयात असतानाही त्याची माता एकांतात सतत त्याच्याशी गप्पा गोष्टी करत असते. तिच्या शब्दांचे संदर्भ आणि अर्थ हेच तिच्या भावना गर्भाशयातल्या बालकापर्यंत पोहोचवण्याचं माध्यम ठरतात. आणि याच शब्दोच्चारातून त्या तान्हूल्याच्या इवल्याश्या ह्रुदयात नव्या भावनांची निर्मिती होत असते. या ध्वनीलहरींना ते बाळ प्रतिक्रिया देऊ लागतं. याचपद्धतीने बालकाचा विकास होत असताना देखील त्याला घरात बोलल्या जाणाऱ्या भाषेचा शब्दकोश घेऊन जाणीवपुर्वक त्यातले शब्द व त्यांचे अर्थ शिकवावे लागत नाहीत. ते आपसूकच त्याच्याकडून ग्रहण केले जातात. त्याच्या मेंदूकडून केवळ शब्दांचं किंवा अर्थांचं नाही तर त्यांच्या उच्चारांचं ग्रहण, मनन चिंतन केलं जातं. ते स्वर, त्या ध्वनी आत्मसात केल्या जातात. म्हणून तर आपल्या सर्वांची भाषा मराठी असली तरी शब्दांचे उच्चार, बोलण्याचा ढंग, ढब निराळा असतो.

मुल अस्वस्थ झालं की त्याला हसविण्यासाठी, ते रडू लागलं की त्याला शांत करण्यासाठी तोंडाने विविध आवाज काढून त्याचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न इतरांकडून केला जातो. हे आवाज हळूहळू त्याच्या कानांना सवयीचे होतात. बालकाचं लक्ष आकर्षित करणारा खुळखुळ्याचा आवाज तर त्याच्या बाल मनोविश्वाचा एक महत्वाचा भाग बनून जातो. त्याचप्रमाणे स्वतःच्याच पायातील पैंजण, वाळे आणि छुमछुम वाहणारी त्याची नादमधुर घुंगर हीच त्याच्या जीवनातील भाषेची पहिली सुरुवात आहे. नाद म्हणजेच त्याच्यासाठी सांकेतिक आवाजांची एक लिपीच जणू.

मूल गर्भाशयात असताना जे संगीत आई सातत्याने ऐकते त्याचा परिणाम जन्मानंतर बालकावर दिसून येतो. त्याच संगितावर मूल आनंदाने हसताना, डोलताना दिसतं. मातेने नियमित पठण केलेल्या जप,मंत्र, स्तोत्र, ध्यानाचा सकारात्मक परिणाम बालकावर वाढीवर झालेला अनुभवास येतो. मधुर ध्वनीच्या निर्मितीतून जसा आल्हाददायक आनंद, समाधान मिळते त्याचप्रमाणे कर्कश्य व अप्रिय ध्वनी हा संताप, द्वेष, दुःख, भय अशा मानवी भावनांना कारणीभूत ठरतो. याचकारणाने संगीतामध्ये वेगवेगळ्या प्रसंगी, दिवसाच्या वेगवेगळ्या प्रहरात निरनिराळे राग गायले जातात. मानवी भावना आणि ध्वनी यांचे नाते इतके गहिरे आहे की; कानावर पडलेला प्रत्येक स्वर, आवाज, प्रत्येक शब्द अंतर्मनात कोणती न कोणती भावना जन्माला घालतच असतो. आणि क्षणाक्षणाला निर्माण होणाऱ्या विविध भावनांचे थेट पडसाद हे मानवी विचारांवर पडत असतात. अर्थातच मानवी जीवनाच्या अनेक पैलूंवर परिणाम करणाऱ्यात शभाषेचा महत्वाचा वाटा आहे हे आपण नाकारू शकत नाही. त्यामुळे मराठी भाषा दिना दिवशी केवळ मराठीचा उदो उदो करण्यापेक्षा तिची निर्मिती तिचा वापर भाषेतील वागप्रयोग आणि म्हणी यांचा उचित उपयोग म्हणजेच खऱ्या अर्थाने मराठी साहित्याचा अभ्यास आणि मराठीच संवर्धन आहे

– अमृता नरसाळे

आणखी वाचा