बारामती, दि. २६ : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणात एफआयआर दाखल करून सखोल आणि निष्पक्ष चौकशी करावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार आणि युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी हजारो बारामतीकर पोलीस ठाण्यावर एकवटले. गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केले. पोलीस ठाण्याबाहेर मोठी गर्दी जमल्याने परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
अजित पवार यांचे भाऊ राजेंद्र पवार, पुतणे युगेंद्र पवार आणि आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी घोषणाबाजी करत “न्याय मिळालाच पाहिजे” अशी मागणी केली. यावेळी माध्यमांशी बोलताना राजेंद्र पवार म्हणाले, “बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्राला या अपघातामागील सत्य जाणून घ्यायचे आहे. माहिती देण्यात टाळाटाळ होत असल्याने जनतेच्या मनात शंका वाढत आहेत.”
या आंदोलनात सहभागी कार्यकर्त्यांनी अपघाताच्या चौकशीवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “ब्लॅक बॉक्स जळाला असल्याचा दावा संशयास्पद आहे. हा अपघात नसून घातपात असण्याची शक्यता आहे,” असा आरोप काही कार्यकर्त्यांनी केला. तसेच काही अदृश्य शक्ती गुन्हा दाखल होऊ नये म्हणून दबाव टाकत असल्याचाही खळबळजनक दावा करण्यात आला.
रोहित पवार यांनी सांगितले की, DGCA च्या अहवालात विमान कंपनीच्या निष्काळजीपणाचा आणि तांत्रिक त्रुटींचा उल्लेख आहे. “डीजीसीएच्या अहवालानंतर संबंधित लेअर जेट प्रकारची विमाने ग्राउंड करण्यात आली आहेत. तरीही संबंधित ‘व्हीएसआर’ कंपनीवर एफआयआर दाखल होत नाही, ही बाब गंभीर आहे. खराब विमान कोणी दिले, कोणत्या अधिकाऱ्यांनी डोळेझाक केली, याची फौजदारी चौकशी झाली पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली.
बारामतीतील शंभरहून अधिक वकिलांनी रोहित पवार यांच्या समर्थनार्थ पोलीस ठाण्यात उपस्थिती लावली. अनेक कार्यकर्ते पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारात बसून ठिय्या आंदोलन करत होते. “कायद्यानुसार कुठेही ‘झिरो एफआयआर’ दाखल करता येतो. मुंबईत प्रयत्न करूनही एफआयआर स्वीकारण्यात आला नाही, आता बारामतीतही टाळाटाळ सुरू आहे. एखाद्या मोठ्या नेत्याच्या मृत्यूप्रकरणीच जर गुन्हा नोंदवला जात नसेल, तर सामान्य नागरिकांचे काय?” असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला.
दरम्यान, CID चे अपर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत तपासाबाबत माहिती दिली. “घात की अपघात, या दोन्ही शक्यतांचा तपास सुरू आहे. अनेक यंत्रणांचे सहकार्य घेतले जात असून तज्ज्ञांचा सल्ला घेतला जात आहे. AAIB चा अंतिम अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल. तपासात घातपात आढळल्यास योग्य कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात येईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.
अजित पवारांना न्याय मिळावा, हीच आमची भूमिका असून हा लढा सुरूच राहील, असा इशारा रोहित पवार यांनी दिला. या आंदोलनामुळे राज्यातील राजकीय वातावरण अधिक तापले असून या प्रकरणाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.








