राजापूर, दि. २ (आदित्य बाकाळकर): आदरणीय डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या वतीने राजापूर शहर व तालुक्यात दि.१ मार्च रोजी भव्य स्वच्छता अभियान राबविण्यात आले. समाजप्रबोधन आणि स्वच्छतेबाबत जनजागृती हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून आयोजित या उपक्रमात तब्बल ६७६ श्री सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत श्रमदान केले.
प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी आणि डॉ. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान पार पडले. “स्वच्छता हीच सेवा” या भावनेतून शहरासह ग्रामीण भागातील विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर साफसफाई करण्यात आली.
राजापूर शहरातील वैशंपायन पुल परिसर, बागकाझी मार्गे ओगलेवाडी रस्ता, गोठण मैदान, साखळकरवाडी, चव्हाटा ते गणेश घाट, स्टेट बँक रस्ता, एस.टी. डेपो परिसर, मुन्शी नाका, शासकीय विश्रामगृह मार्ग, नगरपालिका गार्डन, साईनगर, राजापूर एस.टी. वर्कशॉप आणि गुरववाडी या भागांत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. तसेच कोंढेतड येथील लक्ष्मीनारायण मंदिर परिसर, निनादेवी मंदिर ते साईमंदिर रस्ता, कोदवली परिसर आणि गुजराळी व कोंढेतड येथील तळी परिसरात साचलेला चिखल व कचरा काढून परिसर स्वच्छ करण्यात आला.
या मोहिमेत शहर व ग्रामीण भाग मिळून सुमारे ६६०० चौ. मीटर क्षेत्रफळाची स्वच्छता करण्यात आली, तर दुतर्फा २४ कि.मी. रस्त्यांवरील कचरा हटविण्यात आला. रस्त्याकडील प्लास्टिक, कचरा, झुडपे आणि अडथळे दूर करून परिसर सुशोभित करण्यात आला. साचलेला कचरा गोळा करून त्याचे योग्य व्यवस्थापन करण्यात आले.
अभियानादरम्यान ४६ टन ५००किलो सुका कचरा आणि १८ टन ५००किलो ओला कचरा असा एकूण ६५ टन कचरा संकलित करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली. अनेक ठिकाणी साचलेला कचरा हटविण्यात आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. परिसरात स्वच्छतेचा लक्षणीय बदल दिसून आला.
भालावली, गावडे आंबेरे, नाटे, नाणार, सागवे, खारेपाटण, कोदवली, केळवली, राजापूर, लांजा, दोनिवडे आणि बाकाळे येथील श्रीसमर्थ बैठकीतील सदस्यांनी सक्रिय सहभाग घेतला. सर्वांनी स्वयंप्रेरणेने श्रमदान करून सामाजिक बांधिलकी जपली.
या उपक्रमासाठी राजापूर नगरपरिषद यांनी आवश्यक साधनसामग्री उपलब्ध करून दिली. खुरपे, हातमोजे, मास्क, पिण्याचे पाणी तसेच पाण्याचा टँकर यांची व्यवस्था करण्यात आली. कचरा संकलनासाठी वाहनांची सुविधा आणि डम्पिंग ग्राउंडची सोयही नगरपरिषदेने केली. श्री सदस्यांनी स्वतःच्या वाहनांच्या माध्यमातून कचरा उचलून प्रशासनाला सहकार्य केले.
नगराध्यक्ष सौ. हुस्नबानू खालिफे यांनी या अभियानाचे स्वागत करून प्रतिष्ठानचे आभार मानले. “स्वच्छ आणि सुंदर राजापूर घडविण्यासाठी अशा सामाजिक उपक्रमांची नितांत गरज आहे,” असे त्यांनी नमूद केले.
यावेळी राजापूर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक अमित यादव यांनीही भेट देऊन सहभागी सदस्यांचे कौतुक केले. नगरपरिषदेचे नगरसेवक, अधिकारी व कर्मचारी वर्गानेही या मोहिमेत सहभाग घेतला.
एकूणच, या व्यापक स्वच्छता अभियानामुळे राजापूर शहर व तालुक्यात स्वच्छतेचा नवा आदर्श निर्माण झाला असून सामाजिक एकजुटीचे प्रभावी दर्शन घडले. समाजहितासाठी एकत्र येऊन कार्य केल्यास सकारात्मक बदल घडविता येतो, याची प्रचिती या उपक्रमातून पुन्हा एकदा आली.








