माझी वसुंधरा अभियान ५.० अंतर्गत कुवारबाव ग्रामपंचायतीचा गौरव; ५० लाख रुपयांचे पारितोषिक

रत्नागिरी, दि. ०६ : पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या माझी वसुंधरा अभियान अंतर्गत रत्नागिरी तालुक्यातील कुवारबाव ग्रामपंचायतीने उल्लेखनीय कामगिरी करत राज्यस्तरावर मानाचा सन्मान मिळवला आहे. ग्रामपंचायतीला ५० लाख रुपयांच्या पारितोषिकासह सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या पंचतत्त्वांच्या संरक्षणाच्या संकल्पनेवर आधारित माझी वसुंधरा अभियान राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये २ ऑक्टोबर २०२० पासून राबविण्यात येत आहे. पर्यावरणपूरक उपक्रम, स्वच्छता, जलसंवर्धन, वृक्षारोपण तसेच नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन या माध्यमातून ग्रामपंचायतींना पर्यावरण रक्षणासाठी प्रोत्साहन देण्याचा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.

माझी वसुंधरा अभियान ५.० हा उपक्रम जून २०२४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत राज्यभर राबविण्यात आला. या अभियानात राज्यातील तब्बल २७ हजार ८९५ ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदवला होता. त्यामधून रत्नागिरी तालुक्यातील कुवारबाव ग्रामपंचायतीने विविध पर्यावरणपूरक उपक्रम यशस्वीपणे राबवून उत्कृष्ट कामगिरी केली. त्यामुळेच या ग्रामपंचायतीची राज्यस्तरावर निवड होऊन तिला ५० लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर करण्यात आले.

हा सन्मान २१ फेब्रुवारी रोजी मुंबई येथील वरळी परिसरातील सरदार वल्लभभाई पटेल क्रीडांगण येथे आयोजित कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते कुवारबाव ग्रामपंचायतीच्या प्रशासक सौ. समीक्षा तळेकर, ग्रामपंचायत अधिकारी विष्णुदास बुंदे, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच माजी सरपंच सचिन यशवंत कोतवडेकर आणि पदाधिकाऱ्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

कुवारबाव ग्रामपंचायतीला मिळालेल्या या यशाबद्दल परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. पर्यावरण संवर्धनासाठी ग्रामपंचायतीने केलेल्या प्रयत्नांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

दरम्यान, या यशाबद्दल महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी संघटना क्रमांक १३६, तालुका शाखा रत्नागिरी यांच्या वतीने ग्रामपंचायत अधिकारी विष्णुदास बुंदे आणि कर्मचाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी संघटनेचे जिल्हा सचिव संजय दळवी, तालुकाध्यक्ष देविदास इंगळे, पतसंस्था संचालक विनोद गुरव, तालुका सहसचिव उल्हास कोळी यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

आणखी वाचा