नाचणे ग्रामपंचायतीला स्वच्छ ग्राम स्पर्धेत कोकण विभागात तृतीय क्रमांक

रत्नागिरी,दि. ०७ : संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत सन २०१९–२०२० या वर्षासाठी आयोजित करण्यात आलेल्या कोकण विभागस्तरीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत रत्नागिरी तालुक्यातील ग्रामपंचायत नाचणे यांनी उल्लेखनीय कामगिरी करत तृतीय क्रमांक मिळवला आहे. या यशामुळे नाचणे गावाच्या स्वच्छता उपक्रमांना विभागीय स्तरावर मान्यता मिळाली आहे.

या स्पर्धेतील बक्षीस वितरण समारंभ बुधवार, दि. २५ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी २.०० वाजता सिडको भवन, बेलापूर (नवी मुंबई) येथील सातव्या मजल्यावरील सभागृहात पार पडला. यावेळी मा. विभागीय आयुक्त, कोकण भवन डॉ. विजय सूर्यवंशी (भा.प्र.से.) तसेच अप्पर आयुक्त डॉ. माणिक दिवे यांच्या शुभहस्ते ग्रामपंचायत नाचणे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या कार्यक्रमास जिल्हा परिषद रत्नागिरीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) श्री. जाधव, रत्नागिरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री. चेतन शेळके, तसेच माजी सरपंच श्री. ऋषिकेश भोंगले, ग्रामपंचायत अधिकारी श्री. गणपत के. खरंबळे उपस्थित होते. याशिवाय ग्रामपंचायत कर्मचारी संजय जं. घोसाळे, राजेश वि. घाग, वैभव वि. सुपल, संभाजी तु. देसाई आणि तन्मय सावंत आदींनीही या समारंभाला उपस्थिती लावली.

नाचणे ग्रामपंचायतीने गावात राबविलेल्या विविध स्वच्छता उपक्रमांमुळे हे यश मिळाल्याचे सांगण्यात आले. गावातील स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि ग्रामस्थांचा सहभाग यामुळे नाचणे गावाने कोकण विभागात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. या यशाबद्दल ग्रामपंचायत पदाधिकारी, कर्मचारी तसेच ग्रामस्थांचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.

आणखी वाचा