नवी दिल्ली, दि. २४ : देशाच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवणारी घटना समोर आली असून आम आदमी पक्ष मध्ये मोठी फूट पडली आहे. पक्षाचे राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांनी पक्षाचा राजीनामा देत भारतीय जनता पक्ष मध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
राघव चड्ढा यांच्यासह खासदार संदीप पाठक आणि अशोक मित्तल यांनी देखील भाजपामध्ये प्रवेश केला. पत्रकार परिषदेत बोलताना चड्ढा यांनी सांगितले की, “राज्यसभेतील आम आदमी पक्षाच्या दोन-तृतीयांश सदस्यांचा पाठिंबा आमच्यासोबत आहे. भारतीय संविधानातील तरतुदींचा वापर करून आम्ही भाजपामध्ये विलीन होण्याचा निर्णय घेतला आहे.”
ते पुढे म्हणाले की, राज्यसभेत आपचे एकूण १० खासदार असून त्यापैकी दोन-तृतीयांशाहून अधिक सदस्यांनी या निर्णयाला समर्थन दिले आहे. सर्व खासदारांनी संबंधित कागदपत्रांवर स्वाक्षरी करून ती राज्यसभा अध्यक्षांकडे सादर केली असल्याचा दावा त्यांनी केला. या निर्णयात हरभजन सिंग, स्वाती मालीवाल, राजिंदर गुप्ता आणि विक्रम साहनी यांचाही समावेश असल्याचे त्यांनी नमूद केले.
गेल्या काही महिन्यांपासून राघव चड्ढा भाजपामध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. त्यातच काही दिवसांपूर्वी पक्षाने त्यांना राज्यसभेच्या उपनेतेपदावरून हटवले होते. एकेकाळी अरविंद केजरीवाल यांचे विश्वासू सहकारी मानले जाणारे चड्ढा अचानक बाजूला पडल्याने राजकीय चर्चांना उधाण आले होते.
आपल्या निर्णयामागील कारण स्पष्ट करताना राघव चड्ढा म्हणाले की, “पक्ष ज्या मूल्यांसाठी स्थापन झाला होता, त्यापासून तो पूर्णपणे भरकटला आहे. मला चुकीच्या कामांमध्ये सहभागी व्हायचे नव्हते. आमच्यासमोर दोनच पर्याय होते—राजकारण सोडणे किंवा सकारात्मक राजकारणासाठी नवा मार्ग निवडणे. त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला.”
दरम्यान, या घडामोडींमुळे आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला असून संघटनात्मक पातळीवर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. विशेषतः पंजाबमधील राजकारणावर याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
भाजपात प्रवेश करणाऱ्या नेत्यांमध्ये स्वाती मालीवाल, अशोक कुमार मित्तल, संदीप पाठक, हरभजन सिंग, बलबीर सिंग सीचेवाल आणि विक्रमजीत सिंग साहनी यांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे.
एकूणच, या राजकीय घडामोडींमुळे देशातील राजकारणात मोठी खळबळ उडाली असून आगामी काळात त्याचे दूरगामी परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.







