रत्नागिरी, दि. ७ : बेंगलोर पोलीस आणि सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून एका व्यक्तीला ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवत तब्बल १ कोटी २३ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य सायबर टोळीचा रत्नागिरी सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी गगनदीप भारद्वाज (रा. नोएडा, दिल्ली) याला दिल्लीतून अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरीतील एका व्यक्तीला आरोपींनी फोन करून मुंबईतील माटुंगा येथील कॅनरा बँकेच्या खात्यातून ३ कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा दावा केला. तसेच आपण बेंगलोर पोलीस आणि सीबीआय अधिकारी असल्याचे सांगून संबंधित व्यक्तीला ‘डिजिटल अरेस्ट’ करण्यात आल्याची भीती दाखवली.
कथित चौकशी, अटक आणि कायदेशीर कारवाईची धमकी देत आरोपींनी ४ नोव्हेंबर २०२५ ते १९ जानेवारी २०२६ या कालावधीत वेळोवेळी पैशांची मागणी केली. भीतीपोटी फिर्यादीने विविध खात्यांमध्ये १ कोटी २३ लाख रुपये जमा केले. नंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी रत्नागिरी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
याप्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१८(२), ३१८(४), ३१९(२), ३(५) तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६(डी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान सायबर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, बँक व्यवहारांचा मागोवा आणि डिजिटल पुराव्यांच्या आधारे आरोपीपर्यंत धागेदोरे पोहोचवले.
दिल्ली व नोएडा परिसरात स्थानिक माहितीदारांच्या मदतीने सापळा रचून पोलिसांनी गगनदीप भारद्वाज याला ताब्यात घेतले. त्याला रत्नागिरीत आणून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली. या तपासातून आणखी आरोपी आणि मोठे सायबर रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी स्मिता सुतार, सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार जाधव, पोलीस हवालदार संदीप नाईक आणि पोलीस कॉन्स्टेबल सौरभ कदम यांच्या पथकाने केली.
दरम्यान, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. कोणतेही पोलीस, सीबीआय किंवा अन्य सरकारी अधिकारी असल्याचे सांगून बँक खाते, सिमकार्ड किंवा आर्थिक गैरव्यवहाराच्या नावाखाली भीती दाखवून पैसे मागितले जात असतील, तर त्यावर विश्वास ठेवू नये. अशा प्रकारचे फोन आल्यास तातडीने सायबर हेल्पलाइन १९३० किंवा जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.








