१५ जूनपर्यंत पेरणीची घाई टाळा; १८ जूननंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

राज्यातील २५ जिल्ह्यांना यलो अलर्ट, कोकणात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा अंदाज

मुंबई, दि. ८ : महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन झाले असले तरी १५ जूनपर्यंत पावसाचा एकंदरीत जोर आणि मान्सूनच्या प्रगतीचा वेग कमी राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असे आवाहन राज्य सरकार आणि हवामान विभागाने केले आहे. दरम्यान, कोकण किनारपट्टीवर पुढील चार ते पाच दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून राज्यातील २५ जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

मान्सूनने दक्षिण कोकणात प्रवेश केला असून सिंधुदुर्ग, रत्नागिरीसह तळकोकणातील अनेक भागांत पावसाने दमदार हजेरी लावली आहे. सावंतवाडी, कुडाळ, दोडामार्ग परिसरात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला असून जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. यंदा मृग नक्षत्र सुरू होण्यापूर्वीच मान्सून दाखल झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार ९ जूनपर्यंत कोकणातील काही भागांत मध्यम ते जोरदार पाऊस पडू शकतो. मात्र त्यानंतर मान्सूनची प्रगती काहीशी मंदावण्याची शक्यता असून १५ जूनपर्यंत राज्यभर समाधानकारक पाऊस होण्याची शक्यता कमी असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत या काळात दुपारनंतर मेघगर्जनेसह वादळी पावसाच्या सरी पडण्याचा अंदाज आहे. मात्र हा पाऊस व्यापक स्वरूपाचा नसल्याने पेरणीसाठी आवश्यक ओलावा निर्माण होईलच असे नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीबाबत सावध भूमिका घ्यावी, असा सल्ला कृषी आणि हवामान तज्ज्ञांनी दिला आहे.

१८ जूननंतर पावसाची शक्यता वाढणार

हवामान तज्ज्ञांच्या मते, १८ जूननंतर राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः कोकण किनारपट्टी आणि घाटमाथा परिसरात जूनअखेरपर्यंत सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे खरीप हंगामासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होण्याची अपेक्षा आहे.

२५ जिल्ह्यांना यलो अलर्ट

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, अकोला यांसह राज्यातील २५ जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. ६ ते ९ जूनदरम्यान काही भागांत ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज असून विजांच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो. नागरिकांनी तसेच शेतकऱ्यांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

तापमानाचा पारा कायम उंचावलेला

मान्सून दाखल झाला असला तरी राज्यातील अनेक भागांत उष्णतेचा प्रभाव कायम राहणार आहे. १२ जूनपर्यंत विदर्भ आणि खानदेशात कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे राहण्याचा अंदाज आहे, तर मराठवाड्यात ३५ ते ४० अंश सेल्सिअस दरम्यान तापमान नोंदवले जाऊ शकते.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. अल निनोच्या पार्श्वभूमीवर पावसाचे वितरण असमान राहण्याची शक्यता असल्याने दुबार पेरणीची वेळ येऊ नये यासाठी शासन विशेष दक्षता घेत असल्याचे त्यांनी सांगितले. कमी पावसातही अधिक उत्पादन मिळावे आणि शेतकऱ्यांचे नुकसान टाळावे, यावर सरकारचा भर राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आणखी वाचा