मुंबई मराठी पत्रकार संघाचे प्रतिष्ठेचे पत्रकारिता पुरस्कार जाहीर

जयंत माईणकर, ज्ञानदा कदम, दिगंबर सावंत, संदीप पागडे, रामकृष्ण खांदारे, राजेंद्र साळसकर पुरस्काराचे मानकरी

मुंबई, दि. १० : मुंबई मराठी पत्रकार संघाच्या ८४ व्या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी प्रदान करण्यात येणाऱ्या पत्रकारितेतील विविध प्रतिष्ठेच्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यंदा ज्येष्ठ पत्रकार जयंत माईणकर, वृत्तनिवेदिका ज्ञानदा कदम, ज्येष्ठ मुद्रितशोधक दिगंबर सावंत, वृत्तछायाचित्रकार संदीप पागडे, पत्रकार रामकृष्ण खांदारे आणि राजेंद्र साळसकर यांची विविध पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली आहे.

पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी ही माहिती दिली. पुरस्कारांचे हे ३६ वे वर्ष असून, प्रत्येक पुरस्कारामध्ये रोख १० हजार रुपये, सन्मानचिन्ह, शाल आणि श्रीफळ प्रदान करण्यात येणार आहे.

हे पुरस्कार २२ जून २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता पत्रकार भवन, आझाद मैदान, मुंबई येथे होणाऱ्या पत्रकार संघाच्या ८४ व्या वर्धापन दिन सोहळ्यात प्रदान करण्यात येतील. या कार्यक्रमाला ‘द प्रिंट’चे संपादक आणि ज्येष्ठ पत्रकार शेखर गुप्ता प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत.

यंदापासून पत्रकार संघाने बहुभाषिक ज्येष्ठ पत्रकार-साहित्यिक स्व. शरद वैद्य यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सर्वोत्कृष्ट निवेदक-सूत्रसंचालक (अँकर) पुरस्कार सुरू केला असून, या पहिल्या पुरस्कारासाठी एबीपी माझाच्या वृत्तनिवेदिका ज्ञानदा कदम यांची निवड करण्यात आली आहे.

पुरस्कार विजेते

  • ‘पद्मश्री यमुनाताई खाडिलकर स्मृती पुरस्कार’ (शोधपत्रकारिता) – रामकृष्ण खांदारे (दै. नवराष्ट्र)
  • ‘कविवर्य प्रा. भालचंद्र खांडेकर पुरस्कार’ (ज्येष्ठ मुद्रितशोधक) – दिगंबर सावंत (महाराष्ट्र टाइम्स)
  • ‘समतानंद अनंत हरि गद्रे पुरस्कार’ (सामाजिक बांधिलकीची पत्रकारिता) – राजेंद्र साळसकर
  • ‘अॅड. अधिक शिरोडकर पुरस्कृत तोलाराम कुकरेजा वृत्तछायाचित्रकार पुरस्कार’ – संदीप पागडे (दै. सामना)
  • ‘युगारंभकार मधुसूदन सीताराम रावकर स्मृती पुरस्कार’ (ज्येष्ठ पत्रकार/संपादक) – जयंत माईणकर
  • ‘स्व. शरद वैद्य स्मृती सर्वोत्कृष्ट अँकर पुरस्कार’ – ज्ञानदा कदम (एबीपी माझा)

याशिवाय, वयाची ६५ वर्षे पूर्ण केलेल्या पत्रकार संघाच्या ज्येष्ठ सदस्यांना सन्माननीय सदस्यत्व व सन्माननीय सहसदस्यत्व प्रदान करण्यात येणार आहे. पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेणारे हे पुरस्कार पत्रकारितेतील गुणवंतांचा गौरव करणारे मानले जातात.

आणखी वाचा