जगबुडी नदीत बुडून तीन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू; खेड तालुक्यावर शोककळा

खेड, प्रतिनिधी : खेड शहर आणि भोस्ते गावाच्या सीमेवर वाहणाऱ्या जगबुडी नदीतील डोहात अंघोळीसाठी गेलेल्या चार तरुणांपैकी तिघांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास घडली. या दुर्घटनेमुळे संपूर्ण खेड तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उकाड्यापासून दिलासा मिळवण्यासाठी आणि पोहण्याचा आनंद घेण्यासाठी चार तरुण जगबुडी नदीच्या पात्रात उतरले होते. खेड शहर आणि भोस्ते गावादरम्यान असलेल्या खोल डोहात ते अंघोळ करत असताना पाण्याच्या खोलीचा आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने चौघेही पाण्यात बुडू लागले.

यावेळी मदतीसाठी आरडाओरड करण्यात आली. मात्र, पाण्याची खोली आणि प्रवाह जास्त असल्याने आकाश रामा कांबळे, नरेश रामा कांबळे आणि कैलास रामा कांबळे हे तिघेही पाण्यात बुडाले. या दुर्घटनेत एका तरुणाला स्थानिकांच्या मदतीने सुखरूप वाचविण्यात यश आले.

घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. आपल्या प्रियजनांच्या मृत्यूची बातमी समजताच नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनाही हा प्रसंग पाहून अश्रू अनावर झाले.

दरम्यान, खेड पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने शोधमोहीम राबवत पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.

उन्हाळा आणि पावसाळ्याच्या सुरुवातीच्या काळात नदी, धरणे आणि खोल डोहांमध्ये पोहण्यासाठी जाणाऱ्यांची संख्या वाढते. मात्र, पाण्याच्या खोलीचा अचूक अंदाज न आल्याने अशा दुर्घटना वारंवार घडत असल्याचे दिसून येत आहे. या दुर्दैवी घटनेत तीन तरुणांचा जीव गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत असून संपूर्ण खेड तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

आणखी वाचा