समृद्धी एक भावना
आगळ्यावेगळ्या उपचारपद्धतीचा परिचय !
– राधा महाबळ (मो. क्र. 919867726123)
आत्ताचा समाज आपण बघतो, तर एक गोष्ट आपल्या लक्षात येते, ती म्हणजे बहुतांश समाजाने मन:स्वास्थ्य गमावलं आहे. ताण, चिंता, दडपण या समस्यांनी समाज त्रासला आहे. प्रत्येकाचं कारण वेगळं. प्रत्येकजण मन:स्वास्थ्याच्या शोधात आहे. प्रत्येकाचा मार्ग वेगळा आहे.
अशा परिस्थितीत सर्वांनाच लागू पडेल अशा मार्गाची आपण ओळख करून घेऊया. हा मार्ग आहे, वृषाली लेले यांनी सांगितलेला ‘पूर्वस्मृती हीलिंग’ या उपचारपद्धतीचा. वृषाली लेले यांनी स्वतः ही उपचारपद्धती विकसित केली आहे. त्याची सविस्तर माहिती देणारे, ‘समृद्धी एक भावना’ हे पुस्तक त्यांनी लिहिले आहे.
‘मानवी मन’ हा एक अतिशय गुंतागुंतीचा विषय आहे. तुमच्या मनातले सकारात्मक विचार तुम्हाला समृद्ध करू शकतात, तर याउलट नकारात्मक विचार तुम्हाला अगदी तळागाळात घेऊन जातात. हा विषय अतिशय गुंतागुंतीचा असला, तरीही कुणी तो एकदम सोपा करून सांगितला, तर त्याचे आकलन चटकन होऊ शकते. मुळात कोणताही विषय हा दुसऱ्याला सोप्या भाषेत समजावून सांगण्यासाठी आपल्या स्वतःला तो पूर्णपणे समजलेला असावा लागतो.
नुकतेच सौ. वृषाली गिरीश लेले यांचे ‘समृद्धी एक भावना’ हे २१६ पानी पुस्तक माझ्या वाचनात आले. हे पुस्तक ‘पूर्वस्मृती हीलिंग’ या एका नवीन उपचारपद्धतीविषयी आपल्याला माहिती देते. नवीन अशासाठी, कारण या उपचारपद्धतीची पूर्ण रचना लेखिकेने स्वतः केली आहे. रेकी, सेकिम, प्राणिक अशा अनेक हीलिंगच्या वेगवेगळ्या प्रचलित उपचारपद्धती असल्या, तरीही या सर्वांपेक्षा वेगळ्या अशा ‘पूर्वस्मृती हीलिंग पद्धती’ या विषयाला वाहिलेले हे पुस्तक आपणास एका वेगळ्या विश्वात घेऊन जाते. सदर पुस्तकाचे ९५% लेखन त्यांनी केवळ १५ दिवसांत पूर्ण केले व पुढच्या १ महिन्यात त्याचे उर्वरित लेखन पूर्ण करून ते प्रकाशितदेखील केले. इतका किचकट व गुंतागुंतीचा विषय इतक्या कमी कालावधीत व तोसुद्धा सोप्या भाषेत वाचकांसमोर उलगडून मांडायचा, यावरूनच लेखिकेची या विषयाची समज व त्यांचे या विषयातील सखोल ज्ञान जाणवते.
‘पूर्वस्मृती हीलिंग’ हा विषय कुणालाही सहज आकलन व्हावा, यासाठी लेखिकेने या पुस्तकात त्याची अतिशय सोप्या पद्धतीने विभागणी केली आहे. मन समर्थ करून त्याचा उपयोग आपल्या अडीअडचणी दूर करण्यासाठी, आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी, व्यक्तिमत्व प्रभावी करण्यासाठी करायचा असेल, तर प्रत्येकाने हे पुस्तक वाचावे हे लेखिका पहिल्याच प्रकरणात आपल्याला पटवून देते. ज्यांना मानसिक, शारीरिक, आर्थिक स्थिती व नातेसंबंध सुधारायची इच्छा आहे, त्या प्रत्येकाने हे पुस्तक विकत घेऊन वाचलेच पाहिजे.
प्रत्येकाचे मन हे विचारांचे उत्पत्तीस्थान असल्याने व विचार करणे ही प्रक्रिया सतत चालू असल्याने मनावर येणाऱ्या वेगवेगळ्या ताणांचे व्यवस्थित वर्गीकरण लेखिकेने केले आहे. याच विचारांच्या तरंगांमुळे मनात निर्माण होणारे भाव म्हणजेच भावना. विविध चांगले-वाईट अनुभव ग्रहण करताना, ज्या भावना उत्पन्न होतात त्यामुळे एक भावनिक ऊर्जा निर्माण होते. ही ऊर्जा मुख्यत्वे आपल्या शरीरावर व वर्तणुकीवर सकारात्मक व नकारात्मक परिणाम करते, असे लेखिका सांगते.
प्रत्येक व्यक्तीला स्वतःची समृद्धी हवी असते. सर्वसामान्य वाचकाला समजावे यासाठी या समृद्धीचे जे चार प्रकार लेखिकेने वर्णन केले आहेत, ते वाचकाने प्रत्यक्षात वाचलेच पाहिजेत. अतिशय सोप्या भाषेत व सोपी उदाहरणे देऊन हे सर्व त्यांनी सांगितले आहे. प्रत्येकाकडे ही समृद्धी असली, तरीही स्वतःकडे नेमकी कोणत्या प्रकारची समृद्धी आहे याची जाणीव आपल्याला नसते. ही जाणीव करून देण्यातच या पुस्तकाचे व पर्यायाने लेखिकेचे महत्त्व अधोरेखित होते.
पुस्तकाच्या लेखिकेचे
पूर्ण नाव – वृषाली गिरीश लेले
ई मेल आयडी – nirmalvisawa@gmail.com
फोन नंबर 9321195309 (व्हॉट्स ॲप मेसेज फक्त)
पृष्ठसंख्या – २१६
पुस्तकाची किंमत ३०० रु.








