खेड, दि. १३ : तालुक्यातील महाळुंगे गावानजीक कार रस्त्याच्या कडेला खड्डयात पडून पलटी होऊन भीषण अपघात झाला . या अपघातात पाचजण गंभीर जखमी झाले आहेत . सर्व जखमींना तात्काळ कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले . यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती देण्यात आली आहे . कार चालकाला झोप अनावर झाल्याने हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मुंबईहून तालुक्यातील नांदिवली या ठिकाणी ह्युंदाई कारने जात असताना म्हाळुंगे गावामध्ये चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या डाव्या बाजूला उलटली . हा अपघात बुधवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घडला. या अपघातामध्ये कारमधील वैभव संपत चिकणे (१२), दीक्षा संपत चिकणे (१७) , विश्वास भिकाजी कदम (४२) , दीपक रमेश कदम (४०) , मालती रमेश कदम (३५) जखमी झाले. यातील दोघाजणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती कळंबणी उपजिल्हा रुग्णालयातून देण्यात आली. सर्व जखमींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी मुंबई येथे हलवण्यात आले आहे . सर्व जखमी हे खेड तालुक्यातील नांदिवली या गावातील असल्याचे पोलिसांनी सांगितले .
खेड महाळुंगे येथील कार अपघातात ५ गंभीर जखमी








