चिपळूण, दि. १६ (प्रतिनिधी): लोकसभा निवडणूकीत बंद असलेले चिपळूणातील कॉंग्रेसचे संपर्क कार्यालय अखेर नव्या तालुकाध्यक्षांच्या नियुक्तीनंतर सुरू झाले आहे. माजी तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांनी राजीनामा दिल्यापासून हे कार्यालय काही महिने बंद होते. मात्र आता तालुकाध्यक्ष लियाकत शाह यांनी सुत्रे हाती घेताच नव्याने दमाने हे कार्यालय सुरू केले आहे.
काही महिन्यापुर्वी प्रशांत यादव यांनी कॉंग्रेस तालुकाध्यपदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त होते. तालुकाध्यक्षपदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू होती. मात्र कॉंग्रेसचे शहराध्यक्ष आणि माजी उपनगराध्यक्ष लियाकत शहा यांच्यावर तालुकाध्यक्षपदाची धूरा सोपवण्यात आली. गेले काही दिवस तालुकाध्यक्षांची निवड नसल्याने संपर्क कार्यालयत कार्यान्वयीत नव्हते. मात्र तालुकाध्यपदी शहा यांची निवड शुक्रवारी जाहीर होताच दुसऱ्याच दिवशी सपंर्क कार्यालय सुरू करण्यात आले.
यानिमीत्ताने कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांनी नवनिर्वाची तालुकाध्यक्ष शहा यांचा सत्कार केला. यावेळी तालुकाध्यक्ष शाह म्हणाले की, राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवून पक्ष मजबूत करण्यावर भर राहिल. शहरासह ग्रामीण भागात पक्षाचे संघटनात्मक जाळे उभारून पक्ष घरांघरापर्यत नेण्याचे काम केले जाईल. शहरासह ग्रामीण भागातील लोकांच्या समस्या आणि अडीअडचणी संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून सोडविण्यात येतील. असा विश्वास कॉंग्रेससचे नवनिर्वाचीत तालुकाध्यक्ष लियाकत शहा यांनी व्यक्त केला. नुकत्याच झालेल्या निवडणूकीत कॉंग्रेसला तसेच महाविकास आघाडीने मोठे यश मिळाले. आगामी विधानसभा निवडणूकीसाठी पक्षाच्या आदेशानुसार काम केले जाईल.
शहरासह तालुक्यात कॉंग्रेसला पुरक वातावरण आहे. आगामी काळात प्रत्येक गावात बुथ निहाय कार्यकर्त्यांचे जाळे उभारण्यावर भर दिला जाणार आहे.
शहरासह तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्याना विश्वासात घेऊनच काम केले जाईल, असा विश्वास शहा यांनी व्यक्त केला. यावेळी महिला जिल्हाध्यक्षा विभावरी जाधव, नंदा भालेकर, माजी नगरसेविका सफा गोठे, लियाकत शेख, कबीर काद्री, संदीप लवेकर, जिवन रेळेकर, इम्तियाज कडू, रिझवान पटेल, सुरेश राऊत, डॉ. दिपक विखारे, अजित कासार, संजय जाधव, तुकाराम पवार, सुजाता शेलार, संजय साळवी, दिपक निवाते आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.








