अहमदाबाद, दि. ०३ (प्रतिनिधी) : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा 17 वर्षांचा संघर्ष, असंख्य निराशा, थट्टा आणि अपयश झुगारून अखेर इतिहास घडला. आयपीएलच्या 18व्या हंगामात बेंगळुरूने पंजाब किंग्जचा 6 धावांनी पराभव करत पहिल्यांदाच इंडियन प्रीमियर लीगचं विजेतेपद पटकावलं. रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली आरसीबीने 190 धावांचा बचाव करत आयपीएल 2025 चं चॅम्पियनशिप आपल्या नावे केली. या विजयासोबतच संघाने आपली वर्षानुवर्षांची प्रतीक्षा आणि चाहत्यांची अधीरता संपवली.
अंतिम सामन्यातील खेळी:
पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून बेंगळुरूला फलंदाजीस आमंत्रित केलं. सुरुवातीला फिल सॉल्ट (16) लवकर बाद झाला, मात्र विराट कोहली (43), मयंक अग्रवाल (24), रजत पाटीदार (26), जितेश शर्मा (24) आणि लियम लिविंगस्टोन (25) यांच्या महत्त्वाच्या योगदानामुळे आरसीबीने 20 षटकांत 9 बाद 190 धावा केल्या. पंजाबकडून आर्शदीप सिंह आणि काईल जेमींसन यांनी प्रत्येकी 3 बळी घेत संघाला सामन्यात राखून ठेवलं.
गोलंदाजांचा ‘विराट’ दम:
आरसीबीच्या कृणाल पांड्याने 4 षटकांत फक्त 17 धावा देत 2 महत्त्वाच्या विकेट घेतल्या. भुवनेश्वर कुमारनेही निर्णायक टप्प्यावर विकेट घेत सामन्याचं पारडं आरसीबीकडे झुकवलं. यश दयालने देखील अत्यंत काटेकोर मारा केला.
पंजाबची झुंज अपुरी पडली:
191 धावांचा पाठलाग करताना पंजाबने चांगली सुरुवात केली होती. प्रभसिमरन सिंग (26) आणि प्रियांश आर्या (24) यांनी 43 धावांची सलामी दिली. मात्र मधल्या फळीत जोश इंग्लिश (39) वगळता इतर फलंदाज अपयशी ठरले. यजुवेंद्र चहल, कृणाल आणि यश दयाल यांच्या अचूक माऱ्यापुढे पंजाबची फलंदाजी कोलमडली आणि 6 धावांनी पराभव स्वीकारावा लागला.
भावनांचा बांध फुटला… विराटचे अश्रू:
सामना संपला आणि विराट कोहलीच्या डोळ्यांतून अश्रू अनावर झाले. मैदानावर गुडघ्यावर बसत त्याने डोळ्यांतून ओघळणारे आनंदाश्रू रोखू शकले नाहीत. 2008 पासून आरसीबीसाठी खेळणाऱ्या विराटने अनेकदा अंतिम फेरी गाठली, पण ट्रॉफीच्या क्षणापासून तो लांबच राहिला. 2025 मध्ये अखेर हे स्वप्न पूर्ण झालं. तो क्षण संपूर्ण क्रिकेटविश्वाच्या काळजात घर करून गेला.
18 वर्षांचा प्रवास – अखेर यशस्वी पूर्णविराम:
2009, 2011 आणि 2016 मध्ये अंतिम सामन्यापर्यंत मजल मारूनही आरसीबीला पराभवाचा सामना करावा लागला होता. यंदा मात्र रजत पाटीदारच्या कर्णधारपदाखाली संघाने तोडून टाकलेले सगळे अपयशाचे साखळदंड.
सोशल मीडियावर विराटचा जल्लोष:
“हा क्षण फक्त ट्रॉफीचा नव्हता, तर 18 वर्षांच्या समर्पणाचं फळ होतं,” अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर चाहत्यांनी व्यक्त केल्या. विराटचे फोटो आणि अश्रूंचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
एकदाचं स्वप्न साकार… आणि आरसीबी चॅम्पियन!
आरसीबीसाठी हा फक्त एक विजय नव्हता, तर एका पिढीच्या क्रिकेटप्रेमाचं स्वप्न होतं. हे स्वप्न 18 वर्षांनी साकार झालं आणि आज “ईSalaCupNamde” या घोषणेने अखेर खऱ्या अर्थाने अर्थ प्राप्त केला.