मुंबई, दि. २८ : राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. यंदाच्या बारावी (HSC) परीक्षेचा निकाल ५ मेपर्यंत, तर दहावी (SSC) परीक्षेचा निकाल १५ मेपूर्वी जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिक्षण मंडळातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही परीक्षांची उत्तरपत्रिका तपासणी पूर्ण झाली असून गुणांचे संकलन अंतिम टप्प्यात पोहोचले आहे.
यंदा बारावीची परीक्षा १० फेब्रुवारी ते ११ मार्च या कालावधीत, तर दहावीची परीक्षा २० फेब्रुवारी ते १८ मार्च दरम्यान पार पडली होती. परीक्षेनंतर विद्यार्थ्यांमध्ये निकालाबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली असून आता निकालाच्या तारखेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बनावट प्रमाणपत्रांना आळा घालण्यासाठी नवा निर्णय
दरम्यान, बनावट गुणपत्रिका आणि प्रमाणपत्रांच्या वाढत्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी शिक्षण मंडळाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. यंदापासून विद्यार्थ्यांना गुणपत्रिका आणि बोर्ड प्रमाणपत्र वेगवेगळे न देता एकाच पानावर देण्यात येणार आहे. या नवीन स्वरूपात विद्यार्थ्याचा फोटो तसेच क्यूआर कोडचा समावेश असेल.
क्यूआर कोड स्कॅन केल्यावर संबंधित विद्यार्थ्याची संपूर्ण माहिती तत्काळ उपलब्ध होणार असल्याने बनावटगिरी रोखण्यास मदत होणार आहे. या निर्णयाचे स्वागत शिक्षण क्षेत्रातून होत आहे.
कागदपत्रांची छपाई अंतिम टप्प्यात
सध्या गुणपत्रिकांची छपाई प्रक्रिया सुरू असून निकाल जाहीर झाल्यानंतर साधारण एका महिन्याच्या आत विद्यार्थ्यांना मूळ कागदपत्रे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रे वेळेत मिळणार आहेत.
१७ मेपासून अकरावी प्रवेश प्रक्रिया
दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. यंदाही ही प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीनेच राबवली जाणार असून १७ मेपासून नोंदणीला प्रारंभ होईल. विद्यार्थ्यांना ऑनलाइन गुणपत्रिकेच्या आधारे महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरता येणार आहेत.
ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या माध्यमातून कागदोपत्री आणि प्रत्यक्ष विद्यार्थ्यांमधील तफावत टाळणे, तसेच केवळ नावनोंदणी करून वर्गात अनुपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्यांवर नियंत्रण ठेवणे, हा शिक्षण विभागाचा मुख्य उद्देश आहे.
विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता
निकालाच्या संभाव्य तारखा जाहीर झाल्यामुळे राज्यभरातील लाखो विद्यार्थी आणि पालकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. गेल्या काही दिवसांपासून निकाल कधी लागणार याबाबत चर्चा सुरू होती. आता मे महिन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात निकाल लागण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने विद्यार्थ्यांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे.
दरम्यान, अधिकृत घोषणा शिक्षण मंडळाकडून लवकरच करण्यात येणार असून विद्यार्थ्यांनी केवळ अधिकृत संकेतस्थळांवरूनच निकाल पाहावा, असे आवाहनही करण्यात येत आहे.








