सिडकोचे जलनियोजन : नवी मुंबईकरांसाठी पाण्याचा मजबूत आधार

नवी मुंबई, दि. २७ : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, नैना (नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र) आणि महागृहनिर्माण प्रकल्पांमुळे नवी मुंबईचा वेगाने विस्तार होत आहे. या विस्तारामुळे शहरातील पाण्याची मागणी झपाट्याने वाढत आहे. वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी सिडकोने व्यापक आणि दीर्घकालीन जलनियोजन आराखडा तयार केला असून, त्याअंतर्गत विविध स्रोतांचा वापर आणि नवीन प्रकल्पांची आखणी केली जात आहे.
सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी स्पष्ट केले की, “नवी मुंबईच्या विकासासोबत शाश्वत जलव्यवस्थापनप्रति आमची कटिबद्धता ठाम असून, वर्तमान आणि भविष्यातील गरजा लक्षात घेऊन पायाभूत सुविधा विकसित केल्या जात आहेत.”
सन 2050 पर्यंत सिडको व नैना क्षेत्रातील पाण्याची मागणी 1275 एमएलडीपर्यंत जाणार आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी सिडकोने हेटवणे धरण, मजीप्रा, नवी मुंबई महानगरपालिका, एमआयडीसी या सध्याच्या स्रोतांचा कमाल वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर कोंढाणे व बाळगंगा या दोन नव्या जलस्रोतांची उभारणीही नियोजनात आहे. यामध्ये कोंढाणे धरण प्रकल्प उल्हास नदीवर असून, सुरुवातीस 250 एमएलडी आणि पुढे 350 एमएलडी पाणीपुरवठा करण्याची क्षमता असणार आहे.
या नव्या प्रकल्पांची कामे पूर्ण होण्यासाठी सुमारे 4 ते 5 वर्षांचा कालावधी अपेक्षित आहे. तोपर्यंत सध्याच्या हेटवणे आणि मजीप्रा या स्रोतांतून अतिरिक्त पाणी मिळवण्यासाठी सिडकोने राज्य शासनाकडे विनंती केली होती. त्याअंतर्गत 2020 मध्ये शासनाने 119.80 कोटींच्या बदल्यात 120 एमएलडीचा अतिरिक्त कोटा मंजूर केला असून, सध्या सिडकोला हेटवणे धरणातून 270 एमएलडी पाणी मिळत आहे.
हेटवणे जलावर्धन योजना जून 2029 पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य असून ती टप्प्याटप्प्याने राबवली जात आहे. सद्यस्थितीत या प्रकल्पातील जलशुद्धीकरण केंद्राचे 41 टक्के, कच्च्या पाण्याच्या जलबोगद्याचे 8.5 टक्के, तर शुद्ध पाण्याच्या जलबोगद्याचे 25.7 टक्के काम पूर्ण झाले आहे.
सिडकोकडून या प्रकल्पांच्या प्रगतीवर सतत लक्ष ठेवले जात आहे. प्रकल्प व्यवस्थापनासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सल्लागारांची नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मे. अफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लि. यांच्या सहकार्याने ‘फ्लेमिंगो’ या टनेल बोअरिंग मशिनच्या साहाय्याने एका दिवसात 53 मीटर आणि एका महिन्यात 714 मीटर बोगदा खोदण्याचा विक्रम प्रस्थापित करण्यात आला आहे. याआधीचा राष्ट्रीय विक्रम 679 मीटरचा होता.
कोंढाणे धरणाद्वारे नैना प्रकल्प क्षेत्राला तर हेटवणे योजनेद्वारे सिडको व पनवेल महानगरपालिकेला स्थिर व सुरळीत पाणीपुरवठा सुनिश्चित होणार आहे. नियोजित प्रकल्प वेळेत पूर्ण झाले, तर सिडको प्रशासित भागात पाण्याच्या गरजा समर्थपणे भागवता येतील आणि नवी मुंबईच्या शाश्वत विकासाला अधिक गती मिळेल.

आणखी वाचा