मुंबई, दि. ४ (प्रतिनिधी): राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे तब्बल २१ वर्षांनंतर एकाच व्यासपीठावर एकत्र येत आहेत. शनिवारच्या विजयी मेळाव्याच्या निमित्ताने हे ऐतिहासिक मिलन घडत असल्याने, ठाकरे बंधूंच्या युतीचे हे पहिले पाऊल मानले जात आहे. दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये यामुळे नवचैतन्य निर्माण झाले आहे.
राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली, तर उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे नेतृत्व बाळासाहेब ठाकरेंनंतर संभाळले. दोघांनीही स्वतंत्र राजकीय वाटचाल केली, मात्र आज दोघांनाही त्यांच्या पक्षांच्या घटत्या ताकदीमुळे नव्या राजकीय प्रयोगाची आवश्यकता भासत आहे.
मनसेने एकेकाळी १३ आमदार, नाशिक महापालिका, मुंबई-पुण्यात दमदार उपस्थिती अशी भरभराट अनुभवली होती. पण वेळेनुसार राजकीय घसरण झाली. मराठी अस्मितेपासून हिंदुत्वापर्यंत विविध प्रयोग करूनही पक्षाचा आलेख उंचावला नाही. दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद मिळवले, पण त्यासाठी महाविकास आघाडीचा आधार घेतल्यामुळे त्यांना शिवसेनेत फूट आणि नेतृत्व गमवण्याची मोठी किंमत मोजावी लागली.
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या पक्षाला अवघ्या २० जागा मिळाल्या, तर मनसेला एकही जागा मिळाली नाही. या पार्श्वभूमीवर, दोघांनीही ‘विजयी मेळावा’सारख्या उपक्रमातून राजकीय पुनरुज्जीवनाचा मार्ग स्वीकारल्याचे चित्र आहे.
राज ठाकरे यांना भाजपच्या महायुतीत राहून अस्तित्व टिकवता येईल, पण वाढ शक्य नाही, याची जाणीव झाली आहे. भाजप कधीही मित्रपक्षांना मोठे होऊ देत नाही, हे त्यांनी ओळखले आहे. उद्धव ठाकरेंचीही अवस्था फारशी वेगळी नाही. त्यांच्या पक्षातील अनेक नगरसेवक शिंदे गटात गेले असून, मुंबई महापालिकेत भाजपची ताकद वाढली आहे. अशा वेळी ठाकरे बंधूंनी पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यामागे मराठी मतदारांचा पाठिंबा पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न आहे. गेल्या काही वर्षांत मराठी माणूस वेगवेगळ्या राजकीय पक्षांत विभागला गेला. या विभागणीला थांबवून, “एक मराठी बाणा, एक ठाकरे घराणं” असा भावनिक संदेश दोघंही देऊ पाहत आहेत.
परंतु त्यांच्या वाटचालीत अनेक आव्हाने आहेत. मुंबईत उत्तर भारतीय मतदार भाजपकडे झुकले आहेत, तर मराठी मतांत भाजप व शिंदे गट यांचा वाटा आहे. अशा स्थितीत ठाकरे बंधूंचा करिष्मा, त्यांच्या भाषणातील धार आणि मराठी अस्मितेचा स्पष्ट अजेंडा हेच त्यांचे खरे शस्त्र ठरणार आहे.
एकत्र आलो आहोत, लढायलाही तयार आहोत! – असा निर्धार ठाकरे बंधूंनी करावा लागेल, तरच ही युती यशस्वी ठरेल, अशी भावना त्यांच्या समर्थकांमध्ये व्यक्त होत आहे.