देवरुख, दि. ०९ :: आधार ग्रुप लिंगायत समाज तालुका संगमेश्वर तर्फे दिल्या जाणाऱ्या “समाजरत्न” पुरस्कारासाठी यावर्षी तालुक्यातून पाटगाव येथील सौ. प्रतीक्षा प्रदीप लिंगायत व निवेबुद्रुक येथील राजाराम यशवंत लिंगायत (निवेकर) यांची निवड करण्यात आली आहे. हा पुरस्कार रविवार दि.११ ऑगस्ट रोजी देवरुख येथे होणाऱ्या कार्यक्रमात या व्यक्तींना प्रदान करण्यात येणार आहे.
आधार ग्रुप लिंगायत समाजामध्ये सन २०१५ पासून विविध स्तुत्य उपक्रम राबवत आहे. कोरोना, पूर परिस्थिती व अन्य संकट काळात गरजूना मदतीचा हात देत या ग्रुपने सामाजिक बांधिलकी जपली आहे. याचाच एक भाग म्हणून यावर्षी जेष्ठ नागरिक सत्कार, विद्यार्थी व समाजरत्नांचा गुणगौरव कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
महिला सक्षमीकरणासाठी विशेष काम करणाऱ्या पाटगाव येथील सौ. प्रतीक्षा लिंगायत यांनी आपल्या समाज कार्याच्या जोरावर वेगळी ओळख निर्माण केली आहे. तर निवेबुद्रुक येथील राजाराम लिंगायत हे आज वयाच्या सत्तरीतही समाजसेवेचा वारसा जपत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत यावर्षी त्यांची लिंगायत “समाजरत्न” पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
प्राथमिक शिक्षक पतपेढी सभाग्रह देवरुख येथे होणाऱ्या या कार्यक्रमाला सर्व लिंगायत समाज बांधवानी उपस्थित राहण्याचे आवाहन आधार ग्रुपच्या वतीने करण्यात आले आहे.








