नवी दिल्ली, दि. १६ फेब्रुवारी : जगातील सर्वात मोठ्या तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence – AI) क्षेत्रातील परिषदांपैकी एक असलेल्या “इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026” ला आज राजधानी नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे भव्य प्रारंभ झाला. या शिखर परिषदेचे औपचारिक उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असून ही परिषद २० फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. या परिषदेसोबतच “इंडिया एआय इम्पॅक्ट एक्स्पो 2026” चे आयोजन करण्यात आले असून जगभरातील 300 हून अधिक कंपन्या अत्याधुनिक एआय गॅझेट्स व उपाय सादर करत आहेत.
या परिषदेत सामान्य नागरिकांना प्रत्यक्ष अनुभवातून एआय तंत्रज्ञान कसे कार्य करते, तसेच भविष्यात शेती, आरोग्यसेवा आणि शिक्षण क्षेत्रात कोणते मूलभूत बदल घडून येतील याचे प्रात्यक्षिक पाहता येणार आहे. स्मार्ट शेती, रोगनिदानासाठी एआय प्रणाली, विद्यार्थ्यांसाठी वैयक्तिक शिक्षण प्लॅटफॉर्म, तसेच हवामान बदलावर उपाय शोधण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या एआय मॉडेल्सचे सादरीकरण विशेष आकर्षण ठरत आहे.
जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक दिग्गज या परिषदेसाठी उपस्थित आहेत. यामध्ये सुंदर पिचाई, सॅम ऑल्टमन, डारियो अमोदेई (Anthropic), डेमिस हसाबिस (Google DeepMind), ब्रॅड स्मिथ (Microsoft), यान लेकुन (Meta), क्रिस्टियानो अमोन (Qualcomm) आणि बिल गेट्स (Gates Foundation) यांचा समावेश आहे. तसेच इन्फोसिस, टीसीएस, एचसीएलटेक, झोहो आणि एनव्हीडिया यांसारख्या कंपन्यांचे वरिष्ठ प्रतिनिधीही उपस्थित आहेत. मात्र एनव्हीडियाचे सीईओ जेन्सेन हुआंग यांनी त्यांचा भारत दौरा रद्द केला आहे.
या परिषदेत एआयमुळे रोजगारांवर होणारा परिणाम, तरुणांना एआय कौशल्य प्रशिक्षण कसे द्यावे, सर्वसामान्य लोकांपर्यंत एआय तंत्रज्ञान कसे पोहोचवावे, हवामान बदल रोखण्यासाठी एआयचा वापर, शेती व जलव्यवस्थापनातील नवकल्पना, स्टार्टअप्समध्ये एआयचा उपयोग आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला एआय कसा चालना देईल, या विषयांवर सखोल चर्चा होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करताना सांगितले की, या परिषदेत सहभागी होणाऱ्या जागतिक नेते, संशोधक, धोरणकर्ते आणि नवोन्मेषकांचे त्यांनी मनापासून स्वागत केले आहे. “सर्वजण हिताय, सर्वजण सुखाय” ही या परिषदाची थीम असून मानवतेच्या प्रगतीसाठी एआयचा सकारात्मक वापर करण्याचा संदेश यातून दिला जात आहे.
या परिषदेत सहभागी होण्यासाठी इच्छुक नागरिकांनी अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करून ई-पास मिळवावा, असे आयोजकांनी कळविले आहे. AI Impact Summit 2026 मुळे भारत जागतिक एआय नेतृत्वाच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.







