औद्योगिक वसाहतीतील सांडपाणी वाहून नेणाऱ्या वाहिनीना जाणीवपूर्वक धोका निर्माण करणाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी

चिपळूण, दि. २६ (प्रतिनिधी): लोटे औद्योगिक वसाहतीमधील सांडपाणी वाहीनी व चेंबर्समध्ये कचरा टाकून वाहिनीस धोका निर्माण करण्याचे प्रयत्न करणाऱ्या व उद्योजकांची प्रतिमा मलिन करणाऱ्या समाज कंठकांवर कडक कारवाई करावी अशी मागणी आपण लोटे परशुराम इंडस्ट्रीज असोसिएशनच्या वतीने रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्याकडे फोटो आणि व्हिडिओ शूटिंग या पुराव्यांसहित गुरुवार दिनांक २२ ऑगस्ट २०२४ रोजी केली असल्याची माहिती लोटे परशुराम इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अँड.राज आंब्रे यांनी रविवारी लोटे येथील उद्योग भवन मध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिली. यावेळी उद्योजक शिरीष चौधरी, मिलिंद बारटक्के, राजेश तिवारी, रवींद्र कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
अँड.राज आंब्रे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनामध्ये लोटे औद्योगिक वसाहतीमधील सांडपाणी वाहून नेणारी वाहीनी व चेंबर्समध्ये प्लॅस्टीकच्या गोण्या, दगड, प्लॅस्टीक बुट जाणून बुजुन टाकुन चेंबर ओवरफ्लो होवुन सांडपाणी बाहेर येण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याचे निंदनीय कृत्य केले जात आहेत. त्यामुळे सदर पाणी चेंबर मधून बाहेर पडून नैसर्गिक स्त्रोत खराब होतात तसेच याचा पर्यावरणातील सजीव सृष्टीवर सुद्धा विपरीत परिणाम होवू शकतो.अश्याप्रकारे कृत्य करणे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. यामुळे लोटे औद्योगिक वसाहतीची प्रतिमा मलिन करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे. व त्याचा त्रास परिसरातील उद्योगांना होत असतो तरी या मागे कोण आहे? व त्याचा हेतू काय आहे? याबाबत तपास होणे गरजेचे आहे.सदर चेंबरवरील झाकण वजनाने खुप जड आहेत तरी सदरची झाकणे उघडून अशाप्रकारचे निंदनीय कृत्य केल जात आहे व ते गंभीर आहे.तरी यावरील झाकण लॉक करता येतील अशाप्रकारची बसवावीत असे निर्देश महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला द्यावेत अशा कृत्यामुळे कारखानदारांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. लोटे औद्योगिक वसाहतीमधील वातावरण बिघडविण्यासाठी हेतुपुरस्कर काही लोकांकडून असे काम केले जात असल्याची शक्यता आहे. तरी गांभिर्याने याबाबत सखोल तपासणी होणे आवश्यक वाटते. तरी असे कृत्य करणा-या दोर्षीवर त्वरीत कारवाई व्हावी अशी मागणी उद्योजक संघटनेकडून आपणास करण्यात येत आहे असे निवेदनात म्हंटले आहे.
लोटे परशुराम इंडस्ट्रीज असोसिएशन यांच्या वतीने यापूर्वी देखील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती यानुसार गुरुवार दिनांक १५ ऑगस्ट २०२४ रोजी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने लोटे दूरक्षेत्र पोलीस स्टेशन येथील पोलीस निरीक्षक यांना याबाबत तपास व कार्यवाही करण्याबाबत मार्गदर्शन केले होते या लेखी पत्रामध्ये लोटे औद्योगिक क्षेत्रामधील रासायनिक प्रक्रिया करणा-या कारखान्यांमधून बाहेर पडणारे सांडपाणी औद्योगिक क्षेत्रामध्ये म.औ.वि.महामंडळाने टाकलेल्या वाहिन्या व चेंबर्सद्वारे पुढील प्रक्रिये करिता सामाईक सांडपाणी प्रक्रिया केंद्र या ठिकाणी एकत्रित केले जाते. म.औ.वि.महामंडळातर्फे सदर वाहिनी व चेंबर्सचे दुरुस्ती व देखभालीचे काम करत असताना लोटे औद्योगिक क्षेत्रामधील मे गुड रसायन या कारखानांच्या मागील बाजुस असलेल्या चेंबर्स मधून काही अज्ञातांनी टाकलेल्या रिकाम्या सिमेंटच्या गोण्या, बुट इत्यादी अनेक वस्तु बाहेर काढल्या. सदर वस्तू अज्ञातांनी वाहिनीमध्ये कोंबून ठेवून वाहिनीमधील सांडपाण्याचा प्रवाह अडवण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे सदर सांडपाणी वाहिनी बुजून सांडपाणी चेंबर्स मधून बाहेर पडण्याची शक्यता असते.
सदर चेंबर्स मधून बाहेर पडून सांडपाणी जमिनीवर व नैसर्गिक पाण्याच्या स्त्रोतामध्ये मिसळून नैसर्गिक स्त्रोत खराब होवू शकतो. याचा घातक परिणाम पाण्यातील मासे इतर जनावरे व मनुष्यावरही होण्याचा संभव असतो असे घडल्याने एखादी दुर्घटना घडू शकते किंवा जनक्षोभ उसळू शकतो. तसेच चेंबर्स तुंबल्यामुळे कारखान्यामधून बाहेर पडणारे सांडपाण्याचा विसर्ग न झाल्यामुळे कारखाने बंद पडून उत्पादनावर परिणाम होवू शकतो. तरी महामंडळाच्या रासायनिक सांडपाणी वाहिनी व चेंबर्स मध्ये अवैधपणे कचरा टाकताना सापडलेल्या व्यक्तीवर आपल्या खात्यातर्फे उचित कारवाई व्हावी असे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने पोलीस निरीक्षकांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

आणखी वाचा