राधा लवेकर प्रकरणात शिवसेना महिला आघाडी आक्रमक

चिपळूण, दि. ३१  (ओंकार रेळेकर):  चिपळुणातील राधा लवेकर या महिलेने तालुक्यातील अनेक महिलांना सावकारीच्या माध्यमातून फसविले आहे व आर्थिक फसवणूक केली आहे.तसेच वसुलीसाठी विविध प्रकारचा त्रास दिला आहे. त्यामुळे या महिलेवर लवकरात लवकर पोलिस कारवाई करावी व तिला अटक करण्यात यावी, अशी मागणी चिपळूण तालुका उद्धव ठाकरे गटाच्या महिला आघाडीच्यावतीने करण्यात आली आहे.दरम्यान पुढील तपासाकरिता राधा लवेकर हिला ताब्यात घेण्याच्यासाठी चिपळूण पोलीस लवेकर हिच्या घरी पोहोचले असता ती घरात मिळाली नाही.
विनापरवाना सावकारीसह ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल असलेली येथील राधा लवेकर हिला अटकेसाठी पोलीस पथक सोमवारी तिच्या घरी गेले होते. मात्र ती घरात नसून गायब झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.लवेकर हिला अटक झाल्यास तिने अन्य कोणाला सावकारीचे कर्ज दिले होते का? या बाबतची माहिती पुढे येणार आहे. शहरातील बहाद्दूरशेख नाका येथील कुंदा कारंडे यांनी राधा लवेकर हिच्याकडून सावकारी व्याजाने २० हजार रुपये कर्ज घेतले होते. हे कर्ज घेतेवेळी लवेकर हिने कारंडे यांच्याकडून आधारकार्ड, रेशनकार्ड, पॅनकार्ड, बॉण्डपेपर अशी महत्वाची कागदपत्रे घेतली होती. हे कर्ज फेडल्यानंतर लवेकर हिने घेतलेल्या कागदपत्राची कारंडे यांनी मागणी केली असता ती दिली नाहीत. पुन्हा २५ जून रोजी या कागदपत्रांची मागणी केली असता ती न देता त्याउलट लबेकर हिने कारंडे यांच्याशी वाद घालून त्यांना जातीवाचक शिवीगाळ केली. या प्रकरणी राधा लवेकर हिच्यावर सावकारीसह  ॲट्रॉसिटीचा गुन्हा करण्यात आला आहे. तिला अटक करण्यासाठी पोलिसांचे पथक शनिवारसह सोमवारी तिच्या खेंड येथील राहत्या घरी गेले होते.
मात्र ती घरातून गायब झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. लवेकरला अटक झाल्यास विनापरवाना सावकारीचे कर्ज कोणा-कोणाला दिले, याची माहिती पुढे येणार आहे.
याबाबत शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडी उपजिल्हा संघटिका धनश्री शिंदे, आणि महिला पदाधिकाऱ्यांनी  उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने यांना निवेदन दिले व त्यांनी या विषयावर पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा केली. या महिलेविरोधात ॲट्रॉसिटी व बेकायदा सावकारीचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे तिला तत्काळ शोधून अटक करावी अशी मागणी करण्यात आली.  अटक करण्याच्या वेळीच राधा लवेकर गायब कशी झाली पोलिसांनी कसून तपास करावा लवेकर हिला अटक न झाल्यास आम्ही शिवसेना महिला पदाधिकारी वेळप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांची भेट घेऊन कारवाईची मागणी करणार असल्याचे उबाठा शिवसेना महिला आघाडीच्या चिपळूण शहर प्रमुख वैशाली शिंदे यांनी येथे बोलताना सांगितले.
यावेळी धनश्री शिंदे, शहरप्रमुख वैशाली शिंदे, शहर समन्वयक श्रद्धा घाडगे, शिवानी कासार, दीप्ती सावंतदेसाई, तेजस्वी किंजळकर, सुप्रिया शिंदे, अमिता कानडे, सानिका टाकळे, सोनाली चव्हाण, सायली कदम, जयश्री सकपाळ, धनश्री खंडजोड़े, वृषाली घाणेकर, रेश्मा चव्हाण, नंदिनी पड्याळ आदी महिला उपस्थित होत्या.

आणखी वाचा