दापोली, दि. ४ : दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने आणि आत्मविश्वासाने जगता यावे, त्यांच्यासाठी स्वावलंबनाची वाट खुली व्हावी या उदात्त हेतूने ‘गर्व से सेंटर’ या उपक्रमाचा शुभारंभ दापोलीत मोठ्या उत्साहात झाला. सुशीला अपार्टमेंट, गाळा नंबर २, अर्बन बँक शेजारी, सायन्स कॉलेज समोर स्थापन करण्यात आलेल्या या केंद्राचे उद्घाटन नगरपंचायतीच्या कृपा घाग यांच्या हस्ते संपन्न झाले.
या केंद्राची स्थापना ‘माझी सहेली चॅरिटेबल ट्रस्ट’ आणि ‘एनेबल इंडिया’ या संस्थांच्या संयुक्त सहकार्याने करण्यात आली आहे. यावेळी उपस्थित मान्यवरांनी याचे केवळ एक प्रशिक्षण केंद्र नसून दिव्यांग बांधवांसाठी नवे आशास्थान आणि स्वाभिमानाचे प्रतीक असल्याचे मत व्यक्त केले.
प्रमुख पाहुण्या कृपा घाग यांनी आपल्या भाषणात सांगितले, “प्रत्येक दिव्यांग व्यक्तीला सन्मानाने आणि आत्मनिर्भरतेने जीवन जगण्याचा अधिकार आहे. ‘गर्व से सेंटर’ हे त्याच्या दिशेने उचललेले अत्यंत कौतुकास्पद पाऊल आहे. दापोली नगरपंचायतीकडून या उपक्रमाला आवश्यक ते सर्व सहकार्य दिले जाईल.” नगरसेविका साधना बोथरे यांनी देखील ट्रस्टच्या सामाजिक कार्याचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमात एनेबल इंडियाचे महाराष्ट्र समन्वयक विकास गडदे यांनी दिव्यांगांसाठी संस्थेच्या उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. “दिव्यांगांच्या क्षमतेवर विश्वास ठेवून त्यांना सक्षम बनवण्याचे आमचे कार्य केंद्र आहे,” असे ते म्हणाले. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अमित वांजारे यांनीही आपल्या मनोगतात केंद्राचे महत्त्व अधोरेखित करत दिव्यांगांसाठी हे एक उत्तम व्यासपीठ ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.

राजेंद्र बोथरे (अध्यक्ष, कोकण अपंग पुनर्वसन संस्था, दापोली) यांनी भावनिक शब्दांत मनोगत व्यक्त केले. “मी स्वतः दिव्यांग असल्यामुळे दिव्यांगांच्या अडचणी मला उमजतात. ‘माझी सहेली ट्रस्ट

’ जे कार्य करत आहे, ते खरोखर स्तुत्य आहे,” असे ते म्हणाले.
कार्यक्रमासाठी अजय ताजने (राष्ट्रीय अपंग विकास महासंघ, रत्नागिरी), महेश म्हात्रे (संचालक, दीपिका डेव्हलपर्स, मुंबई), रेखा बागूल देवघरकर, काशिकर महेश्वरी विचारे (आनंद फाउंडेशन), अनंत व हरिश्चंद्र कुटरेकर (लोकमान्य लोकोपकारक मंडळ), तसेच कर्णबधीर विद्यालयाचे शिक्षक बलाडे, शिक्षिका बडबे, सुधीर होणवले आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी ‘माझी सहेली ट्रस्ट’ तर्फे सर्व मान्यवरांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. ट्रस्टच्या कार्यकर्त्यांमध्ये सुनील देसाई, नीरज गुप्ता, अवि

नाश चव्हाण, सिद्धेश सातनक, संदीप गोरिवले, अमिषा मयेकर, प्रथमेश नाटुस्कर आणि अजय वायंगणकर यांनी या कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन करून उपस्थितांचे मन जिंकले.








