देवरुख, दि. ११ जूलै : महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाकडून राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भुमिका मजबुत करण्यासाठी राज्यात “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजना लागू करणेत आली आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीकरीता शासनाच्या निर्देशानुसार देवरुख नगरपंचायत कार्यक्षेत्रातील जास्तीत जास्त पात्र महिलांना या योजनेचा लाभ व्हावा यासाठी देवरुख नगरपंचायतीचे प्रशासक तथा मुख्याधिकारी चेतन विसपुते यांनी दि.२ जुलै पासून योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नियोजन करण्यास सुरुवात केली आहे.
त्याकरीता कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी, नगरपंचायत कार्यक्षेत्रातील अंगणवाडी सेविका, DAYNULM अंतर्गत स्थापन बचत गटांच्या अध्यक्षा यांच्या सभा बोलावून योजनेची जनजागृती करणेच्या उददेशाने आवश्यक ती सर्व माहिती देवून अंमलबजावणी आराखडा तयार केला आहे.
नगरपंचायत कार्यक्षेत्रामधील १३ अंगणवाडयांमध्ये ऑनलाईन फॉर्म भरणेकरीता बुथ स्थापन केले असून सदरचे बुथ सकाळी १०.०० ते दुपारी ०३.०० वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले असणार आहेत, तसेच नगरपंचायत कार्यालयामध्ये कार्यालयीन पुर्ण वेळेकरीता सुट्टीच्या दिवसांसह एक बुथ स्थापन केला आहे.
तसेच नगरपंचायतीचे वॉर्ड अधिकारी व अंगणवाडी सेविका या ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज भरणेचे काम बुथवर करीत आहेत, त्याचप्रमाणे गृहभेटी देवून गृहभेटीद्वारे जनजागृती करणे व अर्ज भरुन घेणे हा उपक्रम नगरपंचायतीद्वारे राबविण्यात येत आहे. पात्र लाभार्थींना सोयीस्कर पडेल अशा ठिकाणच्या बुथवर तसेच गृहभेटीदरम्यान त्यांनी ऑनलाईन अर्ज भरावे तसेच अधिकाधिक पात्र लाभार्थी महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासक तथा मुख्याधिकाध् री यांनी केले आहे.
नोडल अधिकारी श्रीम. भाटकर व सहायक नोडल अधिकारी श्री. सरवदे हे या योजनेच्या अंमलबजावणीकरीता बुथनिहाय कामाचा तसेच गृहभेट उपक्रमाचा दैनंदिन आढावा घेत आहेत.








