देवरुख नगरपंचायत तर्फे “घरोघरी तिरंगा” मोहिमेअंतर्गत ०९ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट राष्ट्रीय सणाचे वातावरण

देवरुख, दि. १२ (प्रतिनिधी): केंद्र शासन व राज्य शासनाकडील निर्देशानुसार “हर घर तिरंगा” या उपक्रमाच्या अनुषंगाने स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर दि.०९ ते १५ ऑगस्ट दरम्यान “हर घर तिरंगा” अभियान राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार ग्रामपंचायत, नगरपरिषद, नगरपंचायत आणि जिल्हास्तरावर मोठ्या प्रमाणात विविध उपक्रम आयोजित करणेबाबत तसेच नगरपरिषद, नगरपंचायत मुख्याधिकारी यांनी खादी ग्रामोद्योग, बचतगट आदींच्या माध्यमातून तिरंगा ध्वज उपलब्ध करुन देणे, शिक्षण विभागाच्या माध्यमातून तिरंगा यात्रा, सेल्फी पॉईंट, तिरंगा कॅनव्हास नगरपरिषदेने उपलब्ध करणेबाबत नमुद केले आहे.
त्यानुषंगाने प्रशासक तथा मुख्याधिकारी देवरुख नगरपंचायत, श्री. चेतन विसपुते यांनी देवरुख नगरपंचायतीच्यावतीने “हर घर तिरंगा” या उपक्रमाचे नियोजन करताना कार्यालयाला विदयुत रोषणाई, तिरंगा यात्रा, तिरंगा रॅली (बाईक), सेल्फी पाँईंट, कॅनव्हास, तिरंगा ट्रिब्युट, तिरंगा दौड इत्यादी कार्यक्रमांचे नियोजन केले असून नगरपंचायत कार्यालयामध्ये राष्ट्रध्वज विक्रीसाठी विक्री केंद्र उभारली असल्याचीही माहिती दिली आहे.
देवरुख नगरपंचायतीने दि. १० ऑगस्ट व दि. १२ ऑगस्ट रोजी शालेय विदयार्थ्यांच्या बहुसंख्येने सहभागातून तिरंगा यात्रा हा उपक्रम अतिशय उत्साहात पार पाडला. तसेच दि.१२ ऑगस्ट रोजी देवरुख नगरपंचायत, शहरातील सर्व शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, बँका, पोलीस ठाणे यांचे अधिकारी यांना सोबत घेवून सायंकाळी ठिक ०४.०० वाजता शहरातील प्रभागातून तिरंगा बाईक रॅली घेतली गेली. नगरपंचायतीमार्फत दि. १४ ऑगस्ट रोजी तिरंगा ट्रिब्युट या उपक्रमाअंतर्गत शहरातील स्वातंत्र्यसैनिक तसेच माजी सैनिक यांचा सन्मान व सत्कार कार्यक्रम नगरपंचायत कार्यालयामध्ये आयोजित करणेत आला आहे.
दिनाकं 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान शहरातील नागरीकांना “घरोघरी तिरंगा” अभियानात सहभागी होवून शहरातील प्रत्येक घरावर, इमारतींवर राष्ट्रध्वज उभारावेत तसेच याही वेळी प्रत्येकाने आपली तिरंगा सोबत काढलेली सेल्फी शासनाने तयार केलेल्या संकेतस्थळ https://www.harghartiranga.com/ वर अपलोड करणेसाठी प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री. चेतन विसपुते यांनी आवाहन केले आहे.

आणखी वाचा