रत्नागिरी, दि. २४ (जिमाका)- पर्यटन वाढीसाठी त्रासदायक ठरणाऱ्या एका महत्त्वाच्या मुद्द्यावर पालकमंत्री डॉ. उदय सामंत “अॕक्शन मोड” वर दिसत असून, शहर विद्रुपीकरण करण्यामध्ये मोठा वाटा असलेली अनधिकृत व अनावश्यक असलेली होर्डिंग्ज काढण्याचा निर्णय आता पालकमंत्री श्री सामंत यांनी घेतला आहे. अशी होर्डिंग्ज काढून टाकण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री पदी डॉ. सामंत यांची नियुक्ती झाल्यापासून त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये विकासकामांची अक्षरशः गंगा आणली असल्याचे सर्वत्र दिसून येत आहे. डाॕ सामंत सामंत यांच्याकडे उद्योग खाते असल्यामुळे रत्नागिरी जिल्हा उद्योगाच्या बाबतीत देखील कात टाकताना दिसून येत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात डॉ. सामंत यांच्या माध्यमातून कोट्यवधींची गुंतवणूक येत आहे. उद्योगमंत्र्यांच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अपेक्षेपेक्षा जास्त उद्योग देखील येऊ घातलेले आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येऊ घातलेल्या उद्योगांच्या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये पर्यटक देखील मोठ्या संख्येने येणार असल्याने पालकमंत्री पर्यटनाच्या बाबतीत देखील महत्त्वपूर्ण निर्णय घेताना दिसत आहेत. पर्यटन वाढीसाठी त्यांनी अनेक पर्यटन स्थळे विकसित केली आहेत व काही विकसित होत आहेत.
अनधिकृत व अनावश्यक होर्डिंग्ज ही केवळ शहरच विद्रुप करत नाहीत तर, पर्यटक वा शहरातील नागरिकांना देखील त्रासदायक ठरतात. तसेच अशा होर्डिंग्जमुळे मोठ्या अपघातांचा सुद्धा फार मोठा धोका संभवतो.
या सर्व बाबींचा विचार करून व भविष्यातील रत्नागिरी जिल्ह्याचे व्हिजन डोळ्यासमोर ठेऊन पालकमंत्री डॉ. सामंत यांनी रत्नागिरी शहरासह जिल्ह्यातील सर्व ठिकाणची अनधिकृत व अनावश्यक होर्डिंग काढून टाकण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.