लीड्स (इंग्लंड), दि. २० : भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय संघाच्या फलंदाजांनी जबरदस्त कामगिरी करत इंग्लंडवर वर्चस्व गाजवलं. सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि नव्या कर्णधार शुभमन गिल यांनी झळकावलेल्या शानदार शतकांच्या जोरावर भारताने पहिल्या दिवशी ३ गड्यांच्या मोबदल्यात ३०० हून अधिक धावांचा टप्पा पार केला.
शुभमन गिलचा कर्णधार म्हणून दमदार डेब्यू
कसोटी संघाचं नेतृत्व करताना शुभमन गिलने आपली निवड सार्थ ठरवली. विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या गिलने संयमित आणि डोळस खेळ करत ६वे कसोटी शतक ठोकले. विशेष म्हणजे, कसोटी कर्णधार म्हणून पहिल्याच डावात शतक झळकावणारा तो विजय हजारे, सुनील गावसकर आणि विराट कोहली यांच्या यादीत सामील झाला आहे.
जैस्वालचे आक्रमक शतक
सलामीवीर यशस्वी जैस्वालने १६ चौकार आणि एका षटकाराच्या सहाय्याने १०१ धावांची भक्कम खेळी उभारली. त्याने के.एल. राहुलसोबत ९१ धावांची भागीदारी केली. राहुल ४२ धावांवर झेलबाद झाला, तर पदार्पण करणाऱ्या साई सुदर्शनला खातेही उघडता आले नाही.
गिल-जैस्वाल भागीदारीने ठेवलं बळकट पायावर
दोन गड्यांच्या मोबदल्यात ९२ धावा असताना गिलने जैस्वालसोबत १६४ चेंडूत १२९ धावांची जबरदस्त भागीदारी करत संघाचा डाव सावरला. जैस्वाल बाद झाल्यानंतर गिलने ऋषभ पंतच्या साथीने डाव पुढे नेला.
गिलचा इंग्लंडमध्ये पहिला शतक, २००० कसोटी धावांचा टप्पाही गाठला
गिलने इंग्लंडच्या भूमीवर आपले पहिले कसोटी शतक साजरे केले. त्याने आतापर्यंत इंग्लंडविरुद्ध १९ डावांमध्ये ६५० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. कसोटी कारकिर्दीत ३३ सामन्यांत ६ शतकांसह २००० हून अधिक धावा करणाऱ्या गिलची सर्वोत्तम खेळी १२८ धावांची असून, आजची खेळी त्याच्या यशस्वी वाटचालीला आणखी बळ देणारी ठरली.
भारताची सावध सुरुवात, इंग्लंडचा निर्णय फसला
पहिल्या सत्रात इंग्लंडच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, भारतीय फलंदाजांनी संयमी आणि आक्रमक खेळाची सांगड घालत इंग्लिश गोलंदाजांवर दबाव टाकला. जरी भारताने सहा चेंडूत दोन गडी गमावले, तरी नंतरच्या फलंदाजांनी परिस्थितीवर मात केली.
दोन्ही संघ :
भारत – यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), करुण नायर, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.
इंग्लंड – झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रुट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (यष्टीरक्षक), ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोश टंग, शोएब बशीर.
पहिल्या दिवसाअखेर भारताने सामन्यावर वर्चस्व गाजवत कसोटी मालिकेतील आपली मोहीम जोशात सुरू केली आहे. गिलचा कर्णधार म्हणून आरंभ शुभदायक ठरल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे.