मुंबई मराठी पत्रकार संघाच्या पत्रकारिता पुरस्कारांचे आज वितरण

मुंबई, दि. २० (प्रतिनिधी): मुंबई मराठी पत्रकार संघाच्या ८४ व्या वर्धापन दिनानिमित्त, पत्रकारितेतील प्रतिष्ठेचे विविध पुरस्कार आज शनिवार, दिनांक २० जून २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता पत्रकार भवनात आयोजित विशेष समारंभात वितरित करण्यात येणार आहेत.
या पुरस्कारांचे यंदाचे ३५ वे वर्ष असून, पत्रकारितेच्या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ज्येष्ठ आणि कार्यरत पत्रकारांचा या पुरस्कारांद्वारे गौरव केला जाणार आहे. यंदा पुरस्कारांचे मानकरी म्हणून प्रकाश कुलकर्णी, विद्याधर दाते, सुरज सावंत, काशिनाथ म्हादे, प्रदीप धिवार आणि शिवराम मांजरेकर यांची निवड करण्यात आली आहे.
या निवडीचे काम प्रतिमा जोशी, योगेश बिडवई आणि अभिजित मुळे यांच्या पुरस्कार समितीने पार पाडले. पुरस्कारामध्ये रोख ₹१०,०००, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ यांचा समावेश आहे, अशी माहिती पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी दिली.
या सोहळ्यास ज्येष्ठ पत्रकार व इंडिया टुडे वृत्तवाहिनीचे सल्लागार संपादक राजदीप सरदेसाई हे महनीय प्रवक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी पत्रकार संघाचे ६५ वर्षे पूर्ण केलेले ज्येष्ठ सदस्य यांना सन्माननीय सदस्यत्व व सन्माननीय सहसदस्यत्व बहाल करण्यात येणार आहे.
यंदाचे पुरस्कार विजेते पुढीलप्रमाणे –
शोधपत्रकारिता (पद्मश्री यमुनाताई खाडिलकर स्मृती पुरस्कार) –
श्री. सुरज सावंत व श्री. काशिनाथ म्हादे (विभागून)
मुद्रितशोधक (कविवर्य प्रा. भालचंद्र खांडेकर पुरस्कार) –
श्री. शिवराम मांजरेकर
सामाजिक बांधिलकी (समतानंद अनंत हरि गद्रे पुरस्कार) –
श्री. प्रकाश कुलकर्णी
वृत्तछायाचित्रकार (ॲड. अधिक शिरोडकर पुरस्कृत तोलाराम कुकरेजा पुरस्कार) –
श्री. प्रदीप धिवार
ज्येष्ठ पत्रकार/संपादक (मधुसूदन सीताराम रावकर स्मृती पुरस्कार) –
श्री. विद्याधर दाते
पत्रकारितेतील निष्ठा, सामाजिक भान आणि दीर्घकालीन कार्याचा सन्मान करणारे हे पुरस्कार पत्रकार संघाच्या सन्माननीय परंपरेला पुढे नेणारे ठरतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

आणखी वाचा