चिपळूण, दि. १३ : तालुक्यातील मांडकी–पालवण येथे कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्थेच्या वतीने आयोजित राज्यातील पहिल्या ग्रामीण, कृषी व सहकार मराठी साहित्य संमेलनाला आज शुक्रवार दि. १३ पासून शानदार सुरुवात झाली. दि. १३, १४ व १५ फेब्रुवारीदरम्यान रंगणाऱ्या या राज्यस्तरीय संमेलनाच्या पहिल्याच दिवशी काढण्यात आलेल्या भव्य ग्रंथदिंडीने महाराष्ट्राच्या लोककलेसह भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविले.
मांडकी गावातून पारंपरिक वेशभूषेत, ढोल-ताशांच्या गजरात, संत साहित्य, कृषी संस्कृती आणि सहकार चळवळीचे प्रतीक दर्शविणाऱ्या देखाव्यांसह भव्य ग्रंथदिंडी काढण्यात आली. विद्यार्थी, शेतकरी, महिला बचतगट, साहित्यप्रेमी आणि मान्यवरांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे वातावरण भारावून गेले होते.
या संमेलनामुळे स्थानिक कृषी क्षेत्राला विविध प्रकारे लाभ होणार असल्याचे मत व्यक्त होत आहे. कृषी सुधारणा, आधुनिक शेती तंत्रज्ञान, सेंद्रिय शेती, पीक पद्धतीतील बदल, जलव्यवस्थापन आणि बाजारपेठेतील संधी या विषयांवर होणाऱ्या परिसंवादातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळणार आहे. कृषी तज्ज्ञ आणि विद्यापीठातील संशोधकांच्या उपस्थितीमुळे नवीन संशोधन, सुधारित बियाणे, प्रक्रिया उद्योग आणि मूल्यवर्धन याविषयी थेट संवाद साधण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
तसेच सहकार चळवळीवरील चर्चेमुळे शेतकरी उत्पादक कंपन्या (FPO), बचतगट आणि सहकारी संस्थांना संघटितपणे काम करण्याचे बळ मिळेल. स्थानिक कृषी उत्पादनांना ब्रँडिंग, विपणन आणि थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचे मार्ग सुचविले जाणार असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीस चालना मिळण्याची अपेक्षा आहे. ग्रामीण भागातील युवकांना कृषीआधारित उद्योग, प्रक्रिया प्रकल्प आणि स्टार्टअपच्या संधींबाबत प्रेरणा मिळणार आहे.
संमेलनादरम्यान ग्रामीण साहित्य, कृषी प्रश्न, सहकारातील मूल्ये आणि कोकणातील सांस्कृतिक वारसा या विषयांवर परिसंवाद, कवी संमेलन, पुस्तक प्रदर्शन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे हे संमेलन केवळ साहित्यिक न राहता स्थानिक कृषी व ग्रामीण विकासासाठी मार्गदर्शक ठरणार आहे.
संमेलनाध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक व कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे, स्वागताध्यक्ष म्हणून डॉ. संजय भावे (कुलगुरू, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ), तर प्रमुख कार्यवाह म्हणून डॉ. निखिल चोरगे कार्यरत आहेत. संयोजन समितीचे अध्यक्ष प्रकाश देशपांडे असून राज्यभरातील नामवंत साहित्यिक, कृषी तज्ज्ञ आणि सहकार क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले आहेत.
ग्रामीण जीवन, शेती, सहकार आणि मराठी साहित्याचा संगम घडविणारे हे संमेलन कोकणातील शेतकरी, विद्यार्थी व साहित्यप्रेमींसाठी वैचारिक आणि विकासात्मक पर्वणी ठरत असून, स्थानिक कृषीला नवी दिशा देणारे व्यासपीठ ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.







