तळवली इथे महाराजस्व अभियानांतर्गत दाखले शिबिर संपन्न

गुहागर, दि. ०३ (उत्तम पवार) : इयत्ता दहावी, बारावी आणि पंधरावी चे निकाल लागल्यानंतर पुढील शैक्षणिक सत्र 15 जून पासून सुरू होणार असून या शैक्षणिक प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना जातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले, रहिवासी दाखले, आर्थिक दुर्बल घटकांचे प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर तसेच इतर शैक्षणिक दाखल्यांची आवश्यकता असते. सदरचे दाखले विद्यार्थ्यांना विहित वेळेत देणे आवश्यक असल्याने विविध भागांत महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महाराजस्व अभियानांतर्गत दाखले शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच अनुषंगाने गुहागरचे तहसीलदार परीक्षित पाटील यांच्या आदेशानुसार संपूर्ण तालुक्यामध्ये विविध ठिकाणी दाखले शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार तळवली येथे ग्रामपंचायत सभागृहामध्ये दिनांक 2 जून रोजी सकाळी 10.00 ते सायंकाळी 5.00 वा. या वेळेत विविध दाखले शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
हे शिबिर महाराष्ट्र शासनाच्या महाराजस्व अभियानांतर्गत आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचा मुख्य उद्देश नागरिकांना विविध दाखल्यांसाठी आवश्यक असलेल्या प्रक्रियेबद्दल माहिती देणे आणि त्यांना मदत करणे, तसेच कागदपत्र पूर्ण असलेल्या पालकांना, विद्यार्थ्यांना तातडीने आवश्यक दाखले मिळवून देणे हा होता.
तळवली येथे आयोजित या शिबिरासाठी तळवली चे मंडळ अधिकारी बी. आर. जाधवर, तलाठी एच. आर. भिसे, कर्मचारी सुरज गीजे, महा- ई सेवा केंद्र तळवली चे चालक प्राध्यापक अमोल जड्याळ, यांचेसह तळवली चे प्रभारी सरपंच संतोष जोशी, पत्रकार उत्तम पवार आणि या शिबिराचा लाभ घेण्यासाठी अनेक नागरिक उपस्थित होते. उपस्थितांना मंडळ अधिकारी बी. आर. जाधवर यांनी या शिबिराचा उद्देश सांगून याचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन केले. त्याचबरोबर तलाठी ए. आर. भिसे, महा-ई-सेवा केंद्राचे चालक अमोल जाड्याळ यांनी आलेल्या नागरिकांना दाखल्यांसाठी आवश्यक कागदपत्रांसंदर्भात मार्गदर्शन केले.
या शिबिरामध्ये दिवसभरात जातीचे दाखले – 04, उत्पन्नाचे दाखले – 14, वय अधिवास – 01, नॉन क्रिमीलेअर – 03 असे एकूण 22 विविध प्रकारच्या दाखल्यांसाठी नोंदणी करण्यात आली. यासाठी तळवली ग्रामपंचायतकडून ग्रामस्थांना आवश्यक कागदपत्रांचा तातडीने पुरवठा करण्यात आला. शिबिरासाठी उपस्थित मंडळ अधिकारी, तलाठी, कर्मचारी, महा-ई सेवा केंद्राचे चालक व उपस्थित नागरिक यांचे प्रभारी सरपंच संतोष जोशी यांनी आभार मानले.

आणखी वाचा