मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

रत्नागिरी, दि. २८ (प्रतिनिधी) : मुंबई-गोवा महामार्गावरील रत्नागिरीजवळ हातखंबा येथे झालेल्या भीषण अपघातात एकाचा दुर्देवीरित्या मृत्यू झाला आहे. अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार मंगेश मधुकर भस्मे (वय ४४, रा. पाली, गराटेवाडी) यांचा जागीच मृत्यू झाला. हातखंबा येथील पुलाजवळील धोकादायक वळणावर पुन्हा एकदा भीषण अपघात झाला. हा अपघात आज शनिवारी सकाळी 11 वा.सुमारास झाला आहे. पाली येथील असलेले मंगेश भस्मे हे रत्नागिरीतील एक नामांकित प्रिंटर मेकॅनिक होते त्यांच्या अपघाती मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे.
दुचाकीस्वार भस्मे हे पालीहून रत्नागिरीकडे जात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. हातखंबा येथील वळणावर समोरून येत असलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला (गाडी न. MH 08AL0670) जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, भस्मे यांच्या दुचाकीचा चक्काचूर झाला त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर धडक दिलेल्या अज्ञात वाहन चालकाने घटनास्थळावरून पसार झाला. या अपघाताची माहिती मिळताच हातखंबा येथील महामार्ग वाहतूक केंद्राच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती पाटील, पो. हेडकॉन्स्टेबल गमरे, हेडकॉन्स्टेबल दोरखंडे, पोलीस कॉन्स्टेबल शिंगाडे आदी घटनास्थळी दाखल होऊन वाहतूक सुरळीत सुरू ठेवली. दरम्यान ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलिस देखील दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे
दरम्यान सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अज्ञात वाहनाचा व चालकाचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. अपघातग्रस्त वळण आणि राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाच्या भूमिकेबाबत वाहनचालकांमध्ये तीव्र नाराजी आहे. महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांचे या अपघाती वळण मार्गाकडे दुर्लक्ष असून वाहनचालकांच्या जिवाशी खेळू नका अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहेत.
दुर्घटनेमागे महामार्ग प्रशासनाचा हलगर्जीपणा
मुंबई-गोवा महामार्गाचे हातखंबा-पाली दरम्यानचे काही भाग काँक्रीटीकरण झाले असले तरी उर्वरित भागात मोठ्या प्रमाणावर रस्ते खड्डे पडले आहेत ते धोकादायक स्थितीत आहेत. ठेकेदार ‘ईगल कंपनी’कडून कामाच्या दर्जाबाबत सातत्याने तक्रारी येत असूनही कोणतीही कारवाई होत नसल्याने अपघातांचे सत्र सुरूच आहे. हातखंबा परिसरात लागोपाठ दोन धोकादायक वळणे अनेक अपघातांना निमंत्रण ठरत आहेत. तेथील अरुंद रस्ता, चिखलयुक्त वळण, खड्डे यामुळे पावसाळ्यातील धोका यामुळे वाहनचालकांचे जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. अशातच आता ठेकेदार कंपनीने नव्याने निर्माण केलेले महाविद्यालयाजवळील चढणीचे वळण अपघातांना निमंत्रण देत आहे.
मंगेश भस्मे यांचे रत्नागिरी शहरातील जिल्हा परिषदभवन कार्यालयाजवळ कॉम्प्युटर रिपेरिंगचे दुकान आहे. ते पाली येथील घराकडून आपल्या रत्नागिरी येथील दुकानाकडे चालले होते.ते उत्कृष्ट कॉम्प्युटर मेकॅनिक म्हणून रत्नागिरी परिसरात परिचित होते. त्यांच्या पश्चात आई,पत्नी, दोन लहान मुली, एक भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या मृत्यूने पाली व रत्नागिरी येथील त्यांच्या मित्र परिवाराकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. मंगेश यांच्या अशा अकाली जाण्याने भस्मे कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मंगेश भस्मे हे कॉम्प्युटरचे काम करण्यासाठी खेड पर्यंतही येत असत इतकी त्यांच्या कामाची लोकप्रियता होती. ते मंडणगड तालुक्याचे जावई होते.

आणखी वाचा