Severe Heatwave : या गोष्टी कराल, तर उन्हाळ्यातील उष्ण लाटेचा परिणाम टाळाल

#Severe Heatwave

एप्रिल महिन्यातच उन्हाळ्याने उग्र रुप धारण केले आहे. ज्यामुळे राज्यातील विविध भागांमध्ये उष्णतेची लाट पसरली आहे. मागील १० वर्षांतील सर्वाधिक तापमान एप्रिल महिन्यातच पाहायला मिळत आहे. जगभरातले वैज्ञानिक वाढत्या तापमानाबाबत चिंता व्यक्त करत आहेत, ही तापमान वाढ कशी थांबवावी यासाठी प्रयत्न करत आहेत, उपाययोजनांवर काम करत आहेत. मात्र तोपर्यंत आपला या उष्ण लाटेच्या परिणांमापासून बचाव करण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजना करणे गरजेचे आहे. अन्यथा उष्माघाताचा सामना करावा लागू शकतो. नुकतेच पालघर जिल्ह्यात एका मुलीचा उष्माघाताने मृत्यू झाला. ४०° अंशापुढे तापमान हे पूर्वी मराठवाडा, विदर्भ, खान्देश येथे दिसत होते, कालांतराने पश्चिम महाराष्ट्रात आणि यंदा चक्क कोकण पट्ट्यात तापमान चाळिशी पार गेले. मुंबईसह, ठाणे, रायगड, पालघर, नवी मुंबईसह महाराष्ट्रातील बऱ्याच ठिकाणी ही भयंकर उष्णतेची लाट सुरू असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे, सध्या या उष्णतेच्या लाटेचा परिणाम आपल्यावर कमीत कमी व्हावा यासाठी काय करता येईल ते पाहुया.

वरील मथळा वाचून तुमच्या लक्षात आलेच असेल की मी तुम्हाला ६ महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे जेणेकरून यंदाच्या उन्हाळ्यात आलेल्या या उष्णतेच्या लाटेचा तुम्ही सामना करू शकाल.
* तापमान वाढल्यामुळे नक्कीच सर्वांना अस्वस्थ, विचित्र, चीडचीड होत असेल. सारखे एसी लावणे, थंड पाणी पिणे, बर्फ घातलेले पेय पिणे हे सहाजिक होत असणार याचा परिणाम कामावरही पडत असेल तसेच उष्णतेमुळे सुस्ती येत असेल. तर मंडळी तुम्ही सर्वप्रथम सुती कपडे परिधान करण्यावर भर द्या. पाणी अजिबात फ्रिजमधले किंवा बर्फ घातलेले पिऊ नका कारण त्यामुळे अधिक उष्णता शरिरात वाढते तसेच जर घामाघुम होऊन बाहेरून आल्यावर किंवा व्यायाम केल्यावर अजिबात असे पाणी पिऊ किंवा शीत पेय घेऊ नका यामुळे मायनर हिट स्ट्रोक होऊ शकतो. माठातले पाणी प्या. माठाला ओला फडका गुंडाळून ठेवा. माठातले पाणी हे अॅल्कलाईन्ड असते त्यामुळे शरीर जास्त काळ हायड्रेटेड राहाते.
* एसी आणि सामान्य तापमान यांच्याशी जुळवून घ्यायला तुमच्या शरिराची कसरत होते आहे, म्हणूनच तुम्ही घामाघुम होऊन आल्यावर किंवा घरकाम केल्यावर लगेच १८° अंशांवर एसी करून बसू नका, आधी पंख्याखाली बसा १० मिनिटे शांत व्हा, श्वासोच्छवासाची गती सामान्य होऊ द्या मग एसी सुरू करा २२° अंशापासून मग तो १८° अंशांवर न्या, अगदी १६° करू नका कारण कालांतराने तुम्हाला सर्दी, कप होण्याची शक्यता असते.
* घराबाहेर पडताना काळा चष्मा, सुती स्कार्फ, टोपी, पाणी, छत्री आदी गोष्टी न्या आणि वापरा. पण मी तुम्हाला सांगेन की दोन पाण्याच्या बाटल्या न्या. एकात मीठ, साखर घातलेले पाणी न्या. साधारण एक लीटर पाण्यात ८ चमचे साखर आणि एकचा मीठ मिसळून न्या, यात लिंबू पिळून सरबत बनवण्याची गरज नाही, आणि हो तुम्हाला साखर जास्त वाटत असेल तरी एवढी साखर गरजेची आहे. ही साखर तुम्हाला इंस्टंट एनर्जी देईल, एनर्जी ड्रिंक किंवा इलेक्ट्रॉलपेक्षाही जास्त एनर्जी देईल. जेव्हा कधी तुम्हाला थकवा वाटेल, जास्त घाम येत आहे असे वाटेल किंवा खूपच घसा कोरडा वाटत असेल तेव्हा एक एक घोट सावकाशपणे आणि बसून प्या. 
* दुसरी साध्या पाण्याची बाटली आणि एक सुती सोबत ठेवा. हे पाणी तुम्हाला प्यायला उपयोगी पडेलच पण जेव्हा पटकन पाण्याची सोय उपलब्ध नसेल आणि त्याचवेळी जेव्हा तुम्हाला शरिराची लाही होते आहे असे वाटेल किंवा खूपच ऊनाचा त्रास होत असेल तेव्हा हे कापड साध्या पाण्याने भिजवा. भिजलेल्या कापडाने तोंड, मान, गळा, हात, पाय पुसून घ्या यामुळे शरिराला थंडावा मिळेल. विशेषत: पोलीस, वाहतूक पोलीस, वाहनचालक, पोस्टमन, मार्केटींग सेल्समध्ये काम करणारे आदींनी हमखास हे करावे. तसेच फिरायला जाताना किंवा शॉपिंगला जातानाही नेता येईल, कारण ऊन्हाचा कधी कसा त्रास होईल सांगता येत नाही, त्यामुळे गरज पडल्यास नक्की हे उपाय करा.
* खरंतर मंडळी तुम्ही सकाळी उठल्यापासून स्वत:ची काळजी घ्यायला सुरुवात केली पाहिजे. सर्वप्रथम रात्री एक चमचा धणे भरडून ते पाव कप पाण्यात भिजवा आणि सकाळी ते गाळून पाणी प्या, म्हणजे तुम्ही रोज शरिराला दिवसभराच्या उन्हाळ्याच्या परिणामांचा सामना करायला सज्ज कराल. तसेच रोज व्यायाम करताना बेताचा करा. व्यायामापूर्वी भिजवलेले बदाम, खजूर किंवा केळे खा जेणेकरून तुम्हाला व्यायाम करताना एनर्जी कमी पडणार नाही. व्यायामानंतर प्राणायम नक्की करा. या दिवसांत तुम्ही शितली, शितकारी आणि वायुसार या पूर्व प्राणायाम प्रकारांमधील क्रिया नक्की करा. 
* रोजच्या दुपारच्या जेवणात कोशिंबीर, ताक हमखास असू द्या. ताकात जिरे नक्की घाला पण इतर मसाले किंवा मठ्ठा, फोडणीचे ताक हे प्रकार उष्णतेची लाट असेपर्यंत टाळा, छान पातळ, जिरे घातलेले ताक बनवा. तसेच तुम्ही या दिवसांत वेगवेगळ्या कोशिंबीरी करा कडधान्य घातलेल्या कोशिंबीरीने पोटही भरेल आणि थंडावाही मिळेल. बऱ्याचदा खाण्यापेक्षा काहीतरी प्यावेसे वाटते अशावेळी कोशिंबीर खाणे उत्तम. कडधान्यांमध्ये उन्हाळ्यात मूग चांगले. तर मुगाची कोशिंबीर आवर्जून करा. मधल्या वेळेत फळे खाताना, मिक्स फ्रूट न खाता एकावेळी एकच फळ खा. विशेष म्हणजे आंबा खाण्यापूर्वी तो किमान अर्धातास आधी पाण्यात भिजवून ठेवा. उन्हाळ्यात सर्वजण कलिंगड खातात, पण कलिंगड उष्ण असते. हां मात्र त्याची उष्णता आपल्याला उन्हाळ्यात पचनाला मदत करते. त्यामुळे खाताना अति खाऊ नका. आणि महत्त्वाचे म्हणजे वॉटरमेलन ज्यूस ऐवजी कलिंगडाचे काप म्हणजे फळ खा रस नको. रात्री झोपताना दुधाचे सेवन टाळू नका, दूध कसे प्यावे यावर आधीच एक लेख लिहिला आहे, तो वाचून त्याप्रमाणे नक्की दूध प्या.
मंडळी तुम्ही एवढ्या बाबींची काळजी घेतली तर निश्चितच तुम्हाला उष्ण लाटेच्या परिणामांचा त्रास होणार नाही. तसेच आपण सर्वांनी आपल्याकडून फूल ना फुलाची पाकळी म्हणून कार्बन इमर्शन कमी करण्याचा पर्यत्न करुया जेणेकरून आपली आई पृथ्वीचे तापमान कमी होण्यास आपालाही खारीचा वाटा असेल.
– स्वाधिनता जोशी, आयुर्वेदीक वैद्य.

आणखी वाचा