
रत्नागिरी दि. १५ : राज्यात रविवार मुसळधार पावसाने कहर केला होता. यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला तर लांब पल्ल्यांच्या गाड्यांवरही मोठा परिणाम झाला आहे. मुसळधार पावसाने कोकण रेल्वे ठप्प झाली होती. तब्बल 15 तास उलटल्यानंतरही अजूनही कोकण रेल्वे ठप्पच आहे. कोकण रेल्वे सुरू होण्यासाठी अजून काही तास लागण्याची शक्यता आहे अशी माहिती मिळाली आहे.
दिवाणखवटी बोगद्याजवळ दरड कोसळल्याने कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती. दिवाणखवटीजवळ ट्रॅकवरील दरड बाजूला करण्याचे काम सुरू आहे. पावसामुळे अजूनही ट्रॅकवर माती आणि चिखल आहे. तिथला मलबा हटवण्याचे काम सुरू आहे, मात्र अति मुसळधार पावसामुळे काही अडचणी येत आहेत.
याच पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे मार्गावरुन जाणाऱ्या काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. याची माहिती कोकण रेल्वेनं आपल्या ट्विटर हॅण्डलवर दिली आहे. प्रवाशांना वेळापत्रक आणि ट्रेनचं स्टेटस पाहूनच बाहेर पडावं असं आवाहन कोकण रेल्वेकडून करण्यात आलं आहे.
मागील दोन दिवसापासून सतत पडणाऱ्या मुसळधार आणि धो धो पावसामुळे रत्नागिरी सह जिल्ह्यातील सर्वच नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असल्याने पुराचे पाणी शहर आणि गावांमध्ये घुसले असल्याने नागरिकांची एकच तारांबळ उडाली आहे.
दरम्यान मागील पंधरा तासापासून बंद पडलेली कोकण रेल्वेची वाहतूक अजूनही सुरू न झाल्याने अखेर विविध ठिकाणी अडकून पडलेल्या प्रवाशांच्या मदतीसाठी एस.टी.ची लाल लाल परी धावून आली आहे.
मागील पंधरा तासांपासून विविध रेल्वे स्थानकावर अडकून पडलेल्यांना अखेर एसटी गाड्यातून मुंबई गोवा आदी ठिकाणी पोहोचले जात आहे. खेड ते दिवाणखवटी दरम्यान रेल्वे मार्गावर पडलेली दरड अद्याप ही हटवण्याचे काम सुरू आहे आणि त्याला मुसळधार पावसामुळे अडथळे येत असल्याने अखेर कोकण रेल्वे प्रशासनाने संपूर्ण महामार्ग बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याने मार्गावरून धावणाऱ्या सर्वच गाड्या जवळपास रद्द करण्यात आलेल्या आहेत. पावसाळ्यापूर्वी महामार्गाची पाहणी करण्यात आली होती.आणि त्यानंतर ही मागील पंधरा दिवसात दोन वेळा रेल्वे वाहतूक बंद पडली आहे.








