नव्या पुतळ्यालगत जमीन खचली; राजकोट किल्ल्यावर घडलेल्या प्रकारामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट

मालवण, दि. १५ (प्रतिनिधी): मालवण येथील ऐतिहासिक राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नव्या अश्वारूढ पुतळ्यालगतची जमीन खचल्याची गंभीर घटना उघडकीस आली असून, या प्रकारामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पुतळ्याच्या डाव्या बाजूला मोठं भगदाड पडले असून तेथील जमीन खोलवर खचल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. यामुळे या पुतळ्याच्या बांधकामाच्या दर्जावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
केवळ महिन्याभरातच धोक्याची घंटा
या पुतळ्याचे उद्घाटन काही आठवड्यांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले होते. प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांनी केवळ सात-आठ महिन्यांत या भव्य अश्वारूढ पुतळ्याची निर्मिती केली होती. मात्र उद्घाटनाच्या अवघ्या महिन्याभरातच चबुतऱ्यालगतची जमीन खचल्यामुळे कामाच्या दर्जाबाबत गंभीर शंका उपस्थित होत आहेत.
पूर्वीही घडला होता अपघात
या अगोदर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेला पहिला पुतळा अवघ्या सहा महिन्यांत कोसळल्याची घटना घडली होती. त्यानंतरच नव्या पुतळ्याची उभारणी करण्यात आली. मात्र पुन्हा एकदा समस्यांचा सामना करावा लागत असल्याने, नियोजन आणि कामाच्या देखरेखीतील त्रुटी समोर येत आहेत.
प्रशासनाची उशिरा हलकी हालचाल
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाचे धाबे दणाणले. रविवारी सायंकाळी प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि पाहणी केली. मात्र पुढील कारवाईबाबत कुठलीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.
शिवप्रेमींनी मागणी केली आहे की, या घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी आणि पुतळ्याच्या सुरक्षिततेबाबत तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात.

आणखी वाचा