रत्नागिरी, २१ जुलै : दिव्यांगांच्या पुनर्वसनासाठी कार्यरत असलेल्या ‘आस्था’ संस्थेच्या फिरत्या श्रवण चाचणी केंद्राचे आज रत्नागिरीत थाटात उद्घाटन झाले. ग्रामीण व दुर्गम भागातील श्रवणबाधित दिव्यांगांपर्यंत पोहोचण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे.
या केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख उपस्थितीत मा. श्री. शामसुंदर काळे यांच्या हस्ते नारळ वाढवून आणि सौ. चंद्रकला पाथरे यांच्या हस्ते फीत कापून औपचारिक सुरुवात करण्यात आली.
‘आस्था’ संस्थेच्या वतीने २०१८ पासून “कानमंत्र – श्रवण सक्षमतेचा” या प्रकल्पाअंतर्गत नियमित श्रवण तपासणी शिबिरे आयोजित केली जात आहेत. या शिबिरांमधून निदान झालेल्या अनेक बालकांना शस्त्रक्रिया व नियमित थेरपीद्वारे मुख्य प्रवाहात आणण्यात यश मिळाले आहे. मात्र, रत्नागिरी जिल्ह्याच्या भौगोलिक अडचणींमुळे अनेक गरजूंपर्यंत सेवा पोहोचू शकत नव्हती. हे लक्षात घेता फिरते श्रवण चाचणी केंद्र सुरू करण्याची गरज निर्माण झाली हो
ती.
या उपक्रमासाठी रामराज्य सहकारी बँक, पुणे चे संचालक श्री. रामकृष्ण फुले व श्री. संदेश इनामके यांनी पुढाकार घेतला. रिटेनमायर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, ठाणे यांच्या सामाजिक बांधिलकी प्रकल्पातून मॅनेजिंग डायरेक्टर मा. रोहीत राऊत व जनरल मॅनेजर श्री. संजीव चव्हाण यांच्या सहकार्याने या केंद्रासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात आला.
या केंद्रामध्ये नवजात बालकांपासून प्रौढांपर्यंत सर्वांसाठी अत्याधुनिक साऊंड ट्रीटेड रूमची सुविधा असून, OAE, BERA, PTA इत्यादी श्रवण चाचण्या तंत्रशुद्ध पद्धतीने करता येणार आहेत. यामुळे वेळेत निदान होऊन योग्य उपचार शक्य होतील आणि श्रवणदोषाचे दीर्घकालीन परिणाम टाळता येणार आहेत.
उद्घाटन प्रसंगी चिंतामणी मोटार्सचे श्री. उज्वल साठे, डॉ. कश्मिरा चव्हाण (ईएनटी), ऑडिओलॉजिस्ट प्राजक्ता भोगटे-सातवसे, राष्ट्रसेविका समितीच्या सौ. उमा दांडेकर, तसेच आस्था संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘फिरते श्रवण चाचणी केंद्र’ हा उपक्रम रत्नागिरीसह संपूर्ण कोकणात श्रवणबाधितांना दिलासा देणारा ठरणार असून, समाजाच्या मुख्य प्रवाहात त्यांचा सहभाग वाढवण्यास मदत करणार आहे.