रत्नागिरी/सिंधुदुर्ग, दि. 01 : वीज ग्राहकांच्यात वीज अपघातांबाबत जागरूकता निर्माण व्हावी, वीज अपघातांचे प्रमाण शून्यावर यावे म्हणून महावितरणने मॅरेथॉन – ‘रन फॉर सेफ्टी’चे आयोजन केले होते. रत्नागिरी परिमंडलाचे कार्यकारी अभियंता (प्रशासन) अभिजीत सिकनीस यांच्या हस्ते या मॅरेथॉन – ‘रन फॉर सेफ्टी’ला झेंडा दाखवून सुरुवात झाली.
या मॅरेथॉन – ‘रन फॉर सेफ्टी’लाक कार्यकारी अभियंते नितिन पळसुलेदेसाई, हरी ताम्हणकर, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्रीकृष्ण वायदंडे, वरिष्ठ व्यवस्थापक (विवले) मिलिंद कानडे, उप व्यवस्थापक (मासं) राजेंद्र जाधव तसेच महावितरण कार्यालयातील उपविभागीय अधिकारी, शाखा अभियंते व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“आम्ही सुरक्षेचे शिल्पकार शुन्य अपघाताने करू महावितरणचे ध्येय साकार” हे ब्रिद घेऊन महावितरणच्या सर्व क्षेत्रिय कार्यालयात दि.1 ते 6 जून 2025 दरम्यान विद्युत सुरक्षा सप्ताहात विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच भाग म्हणून महावितरणचे अधिकारी व कर्मचारी रत्नागिरी शहरात धावले.
यावेळी कर्मचाऱ्यांनी वीज सुरक्षेचे संदेश देणारे फलक हातात पकडले होते तसेच वीज सुरक्षेबाबत विविध घोषणाही देण्यात आल्या. परिमंडल कार्यालयात आल्यानंतर कार्यकारी अभियंत्यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना वीज सुरक्षेबाबत मार्गदर्शन केले. त्यांनतर स्वतःच्या व नागरिकांच्या विद्युत सुरक्षेबाबत सजग राहत अपघात टाळण्याची सामुहिक शपथ देण्यात आली व कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रम यशस्वी करण्यात नितीन सावंत यांचा मोलाचा वाटा होता.