रत्नागिरी, दि. २० (प्रतिनिधी): भारतीय तटरक्षक दलातर्फे येथील नवनिर्माण हाय इंग्लिश मिडियम शाळेत ‘फायर सेफ्टी’ या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. यात भारतीय तटरक्षक दलाचे अधिकारी श्री. विष्णू, अधिकारी रोशन विश्वकर्मा, श्याम लाल यांच्यासह फायरमन जय प्रकाश, पेय्याला राजू, श्री. रविंदर, श्री. अजय यांनी मार्गदर्शन केले.
या प्रसंगी नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या संचालिका सौ. सीमा हेगशेट्ये, विद्यार्थी आणि शिक्षक उपस्थित होते. अधिकारी श्री. विष्णू आणि रोशन विश्वकर्मा यांनी समाजात आगीच्या सुरक्षेविषयी जागृती निर्माण करण्यासाठी ही कार्यशाळा घेत असल्याचे सांगितले. फायरमन जय प्रकाश यांनी विद्यार्थ्यांना आगीचे विविध प्रकार आणि त्या विझविण्याच्या पद्धती, त्यासाठी वापरली जाणारी उपकरणे यांची संगणकीय सादरीकरणाद्वारे सविस्तर माहिती दिली. या वेळी तटरक्षक दलाच्या जवानांनी विद्यार्थ्यांना आग विझवण्याचे सीलिंडर्स कसे हाताळले जातात याचे प्रात्यक्षिकही दाखवले. तसेच आग लागल्यानंतर काय करावे आणि काय करू नये याची सविस्तर माहिती दिली.
त्यानंतर विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी अधिकारी रोशन विश्वकर्मा, फायरमन जय प्रकाश यांनी समाधानकारक उत्तरे देऊन त्यांचे शंका निरसन केले. नववीतील विद्यार्थिनी सृष्टी कोकरे हिने सूत्रसंचालन केले.







