रत्नागिरी, दि. २० जुलै: रत्नागिरी तालुक्यातील कुवारबाव ग्रामपंचायत हद्दीतील पत्रकार कॉलनी शेजारी नव्याने सुरु होऊ घातलेल्या बारच्या विरोधात परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. परिसरातील नागरिकांनी याविरोधात एकत्र येत सही मोहीम राबवून जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री मा. उदय सामंत व आमदार श्री. किरण सामंत यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, श्री. विकास सदाशिव चव्हाण यांनी त्यांच्या राहत्या घरात – भाऊबीज बंगला, पत्रकार कॉलनीजवळ – बार सुरु करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे परवान्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पोलीस विभागाकडून जागेची पाहणी देखील करण्यात आली आहे.
या परिसरात शासनाचा भूखंड असलेल्या पत्रकार कॉलनीसह भूविकास कॉलनी, जिल्हा परिषदेची शाळा आणि माने इंटरनॅशनल स्कूल आहे. महिलांचा, मुलांचा, ज्येष्ठ नागरिकांचा या भागातून नेहमीच मोठ्या प्रमाणावर वावर असतो. त्यामुळे अशा ठिकाणी बार सुरु झाल्यास सामाजिक वातावरण बिघडण्याची दाट शक्यता असल्याची नागरिकांची स्पष्ट भूमिका आहे.
ग्रामपंचायत कुवारबावनेही बारला परवानगी नाकारलेली असूनही, परवाना मिळवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे नागरिकांनी दाखल केलेल्या निवेदनात स्पष्ट मागणी करण्यात आली आहे की, “या बारला कोणतीही परवानगी देण्यात येऊ नये. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आणि परिसरातील सामाजिक समतोल लक्षात घेता प्रशासनाने त्वरित हस्तक्षेप करावा.”
नागरिकांनी सादर केलेल्या निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक व ग्रामपंचायत प्रशासन यांच्याकडेही पाठवण्यात आली आहे.
या प्रकरणी प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी आणि सामाजिक सुरक्षेला प्राधान्य द्यावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.